अकोला दिव्य न्यूज : हिंदीसक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून दोन्ही नेते हिंदीसक्ती विरोधात मुंबईत मोर्चा काढणार आहेत. उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी आपण 7 जुलैला मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी हिंदीसक्ती विरोधात 6 जुलैला मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. पण 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यामुळे मनसेकडून 5 जुलैला मोर्चा काढला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यानंतर आता पडद्यामागची मोठी घडामोड समोर येत आहे. दोन्ही ठाकरेंच्या पक्षाकडून एकत्र मोर्चा घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्याचं वृत्त काही मराठी वृत्त वाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. यामुळे आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना जास्त उधाण आलं आहे.

राज्यात शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून तीन भाषांचं सूत्र अवलंबलं जात आहे. यानुसार आता मराठी माध्यमातील शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचं शिक्षण दिलं जाणार आहे. पण या निर्णयास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विरोध आहे. ठाकरे बंधूंकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. राज ठाकरे यांनी आपल्या मोर्चात सर्व मराठीजणांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या मोर्चाला कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूसच करेल. केवळ मराठी व्यक्ती म्हणून सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत एकाच मोर्चात सहभागी होणार का? असा प्रश्न उस्थित होतोय. विशेष म्हणजे या चर्चांना पोषक अशा घडामोडी पडद्यामागे घडत असल्याची देखील माहिती आहे. पण या वृत्ताला कुणाकडूनही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रातलं राजकारण बदलणार
या मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, आणि त्यांच्यातील सलोखा आणखी वाढला तर महाराष्ट्राचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत त्यामुळे मोठा फरक पडण्याची शक्यता आहे. याशिवाय फक्त मुंबईच नाही तर राज्यभरात त्याचे पडसाद पडताना दिसतील. याशिवाय दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच दोन भाऊ एकत्र आल्याने महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची शक्यता आहे. पण दोन्ही भाऊ खरंच एकत्र येतील का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.