अकोला दिव्य न्यूज : आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात सध्यस्थितीत ‘डिजीटल प्लेट फॉर्म’वर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आज सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण अंग होत आहे. काळाची पावले ओळखून अकोला शहरातील अदिती बाहेती हिने मोठी क्षेप घेतली. राजस्थान राज्यातील आयटी जोधपूर येथून तिने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) या जागतिक महत्त्वाच्या विषयात एम.टेक पूर्ण केले. यासोबतच तिच्या विभागात तिने अव्वल स्थान पटकावून महाविद्यालयीन स्तरावर रौप्य पदक जिंकले. अदिती हिने स्वतःच्या यशाचा मार्ग प्रशस्त करण्यासह बाहेती कुटुंब आणि अकोलेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या यशाबद्दल तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिवंगत गोपीकिशनजी बाहेती यांची आदिती नात तर सहयोग टॅक्स अँड फायनान्स अॅडव्हायझरी लिमिटेडचे सीईओ अँड.आशिष बाहेती आणि अकोला गर्ल्स हॉस्टेलची अध्यक्ष व साई गर्ल्स हॉस्टेलच्या संचालक अनुराधा बाहेती या दाम्पत्याची आदिती मुलगी आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठित कुटुंबातील अदितीने शालेय जीवनातही अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून तिच्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन केले होते. अभ्यासाप्रती असलेली निष्ठा, शांत, शिस्तबद्ध व्यक्तिमत्व आणि आधुनिक विज्ञानातील रस यामुळे आयआयटीसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेत इतक्या स्पर्धात्मक वातावरणातही एक वेगळी ओळख मिळविली आहे.
एआय क्षेत्रातील महिलांसाठी प्रेरणास्थान बनली. आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) हे केवळ संशोधनापुरते मर्यादित नाही तर उद्योग, औषध, वाहतूक, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात क्रांती घडवत आहे. अशा वेळी अदितीसारख्या तरुण प्रतिभेचा सहभाग व नेतृत्व हे भविष्यासाठी एक आशादायक संकेत आहे. विशेषतः या क्षेत्रात अव्वल स्थान मिळवणारी एक विद्यार्थिनी स्वतःच प्रेरणादायी आहे.