अकोला दिव्य न्यूज : Ravindra Chavan डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आलेले आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतल्या वरळीमध्ये हा सोहळा रंगला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किरेन रिजिजू, मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाच्या दिग्गजांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं सोपवण्यात आली. रवींद्र चव्हाण यांची कारकीर्द संघर्षातून उभी राहिली आहे. रवींद्र चव्हाण हे मराठा समाजातील प्रभावी नेते असून त्यांचा तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांबरोबर दांडगा जनसंपर्क आहे.

रविंद्र चव्हाण यांची राजकीय कारकिर्द
रविंद्र चव्हाण हे २००७ मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
२००७ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले.”२००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.
२०१४ मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली.
२०१५-१६ मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. तसेच कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते.
२०१९ मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. २०२२ मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
२०२२ मध्ये रविंद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यांनी पालघर आणि सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघरची जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली
ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोकणात विधानसभा निवडणुकीत सुरुंग लावण्यात रवींद्र चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका राहिली.
पालघरमध्ये ही बहुजन विकास आघाडीला धक्का देत भाजपाचे दोन आमदार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा एक आमदार रविंद्र चव्हाण यांनी निवडून आणला.
शेकापचे बडे नेते अशी ओळख असलेलया जयंत पाटील यांचे भाऊ आणि आमदार सुभाष पाटील, तसंच ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आस्वाद पाटील यांना भाजपात आणण्यात रवींद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा.
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून रवींद्र चव्हाण यांची ओळख, भाजपातला मराठा चेहरा म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोकणात रवींद्र चव्हाण यांनी उत्तम कामगिरी करुन दाखवली. महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. पण नारायण राणेंना कोकणातून निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला तो रवींद्र चव्हाण यांनी.
कल्याणच्या रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या विस्तारासाठी भरपूर काम केलं आहे. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर ते एकूण चारवेळा आमदार झाले आहेत.
महाराष्ट्रात महायुती सरकार आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री केलं जाईल अशी चर्चा होती. पण मंत्रिपद मिळालं नसूनही त्यांनी संयमित भूमिका घेतली आणि ते आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत.
जमिनीशी नाळ जोडलेला आमदार आणि कार्यकर्त्यांना भावनिक पातळीवर समजून घेणारा नेता अशी रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख
साधारण २५ वर्षांपूर्वी भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यावेळच्या शिस्तप्रिय आणि तत्त्वनिष्ठ भाजपच्या मंडळींमध्ये आक्रमक आणि समर्पित कार्यकर्ता म्हणून् ते पुढे येऊ लागले. त्यावेळी विनोद तावडे यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेते मंडळींनी चव्हाण यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सुरुवातीला नाके मुरडणारी मंडळीही झुकू लागली. त्यामुळे संघ, भाजपनिष्ठांचा प्रभाग असलेल्या सावरकर रोडमधून ते नगरसेवक बनले. आनंद दिघे यांनी रुजवलेल्या आणि एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांनी वाढवलेल्या शिवसेनेचेच तेव्हा भाजपसमोर मोठे आव्हान होते. त्या शिवसेनेच्या ‘अरे’ला ‘का रे’ करणाऱ्या माणसाची भाजपला गरज होतीच. ती चव्हाण यांनी पूर्ण केली. त्यामुळे अनेक जुने, कर्तव्यदक्ष नगरसेवक असताना पक्षाने रवींद्र चव्हाणांना स्थायी समितीचे सभापतीपद दिले. तेथूनच त्यांच्या उत्कर्षाचा काळ सुरू झाला. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.
२०२९ मध्ये भाजपा स्वबळावर सत्तास्थापन करणार?
दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला असला तरी रवींद्र चव्हाण यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं असतील. राज्यातील ३५५ तालुके आणि ३६ जिल्ह्यांमध्ये पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकून स्वबळावर सत्तास्थापन करण्याचे भाजपाचे ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी यांनी आज केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आपली संघटना महाराष्ट्रात शिवशाही आणेल असा विश्वास व्यक्त केला आहे.