Thursday, July 3, 2025
HomeUncategorizedअकोल्याच्या 'केआयटीएस' चा जपानमध्ये डंका ! कावासाकीच्या तज्ज्ञांनी केला अकोल्यात गौरव

अकोल्याच्या ‘केआयटीएस’ चा जपानमध्ये डंका ! कावासाकीच्या तज्ज्ञांनी केला अकोल्यात गौरव

अकोला दिव्य न्यूज : बक्कळ पैसा कमविण्याची संधी उपलब्ध असतानाही आपल्या जन्मभूमीचं नांव जगाच्या पाठीवर कोरण्यासोबत भावी पिढीला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हेच जीवनाचे ध्येय ठेवून मागील २० वर्षांपासून वाटचाल करणाऱ्या ‘काजल’ने आपल्या नावासोबत रोबोटिक्स क्षेत्रात ‘अकोला’ हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. एवढेच नव्हे तर तंत्रज्ञान क्षेत्रात ‘दादा’ समजल्या जाणाऱ्या दस्तुरखुद्द जपानने दाखल घेतली. ते सुद्धा तंत्रज्ञान क्षेत्रात ‘दादा’ समजल्या जाणाऱ्या जपान येथील ‘रोबोट’ शास्त्रज्ञांनी !

भविष्याचा वेध घेत, अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची कुठलीही नामांकित संस्था नसताना, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात शेवटून पहिल्या क्रमांकावर असलेल्या अकोला शहराला शिक्षणाचं हब म्हटले जाते.पण हे खरं आहे का ? निश्चितच नाही. बदलत्या काळानुसार भविष्याचा वेध घेत,आधुनिक काळातील डिजिटल आणि रोबोटिक शिक्षण व प्रात्यक्षिक खरोखरच गरजेचे असताना लाखो रुपये घेऊन केवळ शिकवणी देणा-या खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी हे बिरूद लाऊन घेतला ! अशा विपरीत परिस्थितीत धाडस करून २०१५ साली काजल राजवैद्य यांनी अवघ्या वयाच्या २० व्या वर्षी अकोल्यात आपल्या घरातून तीन विद्यार्थ्यांपासून काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्युशन अर्थात ‘केआयटीएस’ सुरू केले.

आज बघता बघता केआयटीएसने २० वर्षाचा टप्पा पार करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संशोधक सेवा कार्याने रोबोटिक्सला नवीन ओळख व स्तर प्रदान करणाऱ्या काजल राजवैद्य यांच्या अकोला येथील काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्युशनचा जपानच्या कावासाकी रोबोटिक्स समूहाच्या शास्त्रज्ञांच्या वतीने सन्मान करण्यात येत असून पश्चिम विदर्भासाठी गौरवास्पद बाब आहे. विशेष म्हणजे हा सत्कार अकोला येथे एका शानदार सोहळ्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती दस्तुरखुद्द जपानच्या कावासकी रोबोटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक हिरोशी मियाके आणि इंडिया सेल्स हेड त्सुयोशी नाकामुरा यांनी दिली.

कावासाकी कंपनीच्च्या रोबोटचा वापर करून ‘केआयटीएस’ ने विविध नाविन्यपूर्ण रोबोटिक्स प्रकल्प तयार करून समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहेत. रोबोटिक्स तंत्रज्ञांचा समाजासाठी उपयोग शक्य असून केआयटीएसने रोबोटिक्सचा वापर शिक्षण, उद्योग, कृषी आणि सामाजिक प्रकल्पांमध्ये प्रभावीपणे केला आहे.

आज केआयटीएस ही संस्था भारतातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, जपान, दुबई, सिंगापूर अशा देशांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे केआयटीएस ने ‘स्मार्ट कन्ट्री टू स्मॉल सिटी’ या उपक्रमातून लहान शहरांतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे रोबोटिक्स तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे. संस्था रोबोटिक्स, एआय, एलओटी, मशीन लर्निंग, एनएलपी यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानात नाविन्यपूर्ण प्रशिक्षण देणे. औद्योगिक ऑटोमेशन आणि तांत्रिक उपाय देऊन उद्योगक्षेत्रात कार्यक्षमतेत वाढ करणे, लहान शहरांतील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार करणे आदीवर भर देत आहेत. त्यांना या सेवेबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अशा अनेक रोबोटिक्स विश्वातील कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन कावासाकी जपानचे तज्ञ स्वतः अकोला येथे येऊन काजल राजवैद्य व केआयटीएसचा सन्मान करीत आहेत.

यावेळी केआयटीएस संस्थापक व संचालक आणि रोबोटिक्स ट्रेनर काजल राजवैद्य, कावासाकी रोबोटिक्स इंडियाचे राष्ट्रीय विक्री व्यवस्थापक शुभम त्यागी, कावासाकी रोबोटिक्स इंडियाचे सहा व्यवस्थापक आनंद जांगीड, देवताल रोबोटिक्स पुणे प्रदीप भुतडा प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!