Friday, July 4, 2025
HomeUncategorizedअकोटला सावत्र बापानेच केली 9 वर्षाचा निष्पाप मुलाची हत्या !

अकोटला सावत्र बापानेच केली 9 वर्षाचा निष्पाप मुलाची हत्या !

अकोला दिव्य न्यूज : अकोट शहर पोलिस स्टेशनला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या बापानेच आपल्या साथीदाराच्या मदतीने नऊ वर्षीय सावत्र मुलाचा खून केल्याचे उघड झाले आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून जंगलात लपवला होता. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने दोन्ही आरोपींना पकडले. खुनाचे कारण अस्पष्ट असले तरी आपल्या मालमत्तेत हिस्सा मिळू नये म्हणून सावत्र बापानेच त्याचा खून केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दर्शन पळसकार असे मृत मुलाचे नाव आहे. तर आरोपी सावत्र बाप आकाश कान्हेरकर आणि त्याचा मित्र गौरव गायगोले यांना अटक करण्यात आली आहे.

दर्शन हा बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आरोपी आकाश कान्हेरकर हा पत्नीसह ठाण्यात गेला होता. आणि मुलगा दर्शन हा दि. २ जुलै रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली असता, दर्शन दोन व्यक्तींसोबत दुचाकीवर जाताना दिसला. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव आकाश साहेबराव कान्हेरकर (३१, रा. चिंचोणी, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) असून तो मुक्ता कान्हेरकर हिचा दुसरा पती असल्याचे उघड झाले. चौकशीत त्याने गौरव वसंत गायगोले (२५) या साथीदाराच्या मदतीने दर्शनला जंगलात नेऊन हत्या केल्याची कबुली दिली. मात्र त्यापूर्वी पोलिस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले असता त्यांनी अचूक ठिकाण सांगण्याऐवजी दिशाभूल केली. आरोपींना ५ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार दर्शन या निष्पाप मुलाचा बळी घेणाऱ्या या क्रूरकर्मा आरोपीच्या विरोधात अकोटात संताप व्यक्त होत असून या आरोपींचे वकीलपत्र घेण्यास विधिज्ञ मंडळींनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे या खटल्यात सुनावणीकरिता विद्यमान न्यायालयाकडून वकिलाची नियुक्ती करण्यात आली, तर सरकार पक्षाच्या वतीने अॅड. जयकृष्ण गावंडे यांनी न्यायालयात आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!