Monday, September 8, 2025
HomeUncategorizedठाकरे बंधू एकत्र.... पण 'तो' प्रश्न कळीचा ठरणार ? तर ठाकरेच...

ठाकरे बंधू एकत्र…. पण ‘तो’ प्रश्न कळीचा ठरणार ? तर ठाकरेच मैदान मारणार

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : हिंदुत्वाचे कडवे समर्थक बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली ती मुळातच मराठीच्या मुद्द्यावरुन ! त्याच बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि पुतण्या आज ५९ वर्षांनी मराठीच्याच मुद्द्यावरुन जवळपास २० वर्षांनंतर सोबत आले. सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरेंनी रान उठवत एल्गार पुकारला. ‘क्राऊड पुलर’ राज ठाकरे यांनी ‘बिना झेंडा- एकच अजेंडा’ चा नारा बुलंद केला. मुंबईत ५ जुलैला मोर्चा काढण्यात येणार, असं जाहीर केलं. दरम्यान पडद्याआड एकत्रिकरणाच्या घडामोडींनी वेग घेतला. ठाकरे ब्रॅण्ड एकत्र येत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने हिंदी सक्तीचे दोन्ही शासकीय अध्यादेश मागे घेतले. तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या ‘मौके पर चौका’ नीतीनुसार मोर्च्याचे रूपांतर विजयी सभेत करीत अखेर ठाकरे बंधू एका मंचावर आले आणि महाराष्ट्रात एका नवीन राजकीय समीकरणांची मुहूर्तमेढ रोवली गेली.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणातील ठाकरे ब्रँड अडचणीत आला आहे. दोन्ही ठाकरेंचे पक्ष संकटात सापडले आहेत.अस्तित्व टिकवण्याचं कडवे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अशावेळी मराठी सक्तीचा मुद्दा आपुसक हाती आले आणि……ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आज मुंबईतील वरळीत संपन्न झाला. या मेळाव्यात भाषण करताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीचे स्पष्ट संकेत दिले. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, अशा शब्दांत उद्धव यांनी मनोमिलनाचे संकेत दिले. वापरुन फेकून देण्याची वृत्ती असलेल्यांना फेकून देणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. यानंतर आता मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्या युतीची चर्चा आणखी जोरात सुरु झाली आहे.

भाषेचा मुद्दा मराठी माणसासाठी भावनिक आहे. त्या मुद्द्यावरुन एका कार्यक्रमात एका मंचावर येणं सोपं होतं. पण दोन स्वतंत्र पक्ष चालवत युती करुन राजकारण करणं सोपं नाही. कारण युतीमध्ये अनेक मर्यादा येतात. याची जाणीव दोन्ही ठाकरेंना आहे. पक्षावरील वर्चस्वावरुन झालेल्या वादातूनच राज ठाकरे यांनी त्यांची वेगळी वाट धरली आणि मनसेची स्थापना केली. आता पुन्हा एकत्र येताना तडजोडी कराव्या लागतील.

मुंबई महापालिकेवरील सत्तेमुळेच शिवसेना टिकली आणि वाढली हे निर्विवाद सत्य आहे. आता त्याच महापालिकेवरील सत्ता टिकवण्याचं आव्हान उद्धव यांच्यासमोर आहे. पालिका हातातून गेल्यास उद्धव यांच्या पक्षाची स्थिती आणखी बिकट होईल. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. गेल्या २ दशकांपासून त्यांच्या पक्षानं सत्ता पाहिलेली नाही. उद्धव यांच्या पक्षासोबत युती केल्यास, त्यामुळे मुंबईत वारं फिरल्यास राज यांच्या पक्षाला थोडे बरे दिवस येऊ शकतात.

मोठ्या माणसांचे इगोही तितकेच मोठे असतात, असं म्हटलं जातं. खरी गोम इथेच आहे. तू मोठा की मी मोठा, हा प्रश्न दोघांसाठी महत्त्वाचा आहे. इगोचा प्रश्न सुटला तर अन्यही प्रश्न सुटतील. पक्षावरील वर्चस्वातूनच राज ठाकरे वेगळे झाले. आता युतीवरील वर्चस्वातून खटके उडाल्यास ठाकरे बंधूंच्या हाती फार काही लागणार नाही. राज ठाकरे आक्रमक भाषण करतात. त्यांची शैली बाळासाहेबांसारखी आहे. पण युती चालवत असताना उद्धव ठाकरेंना राज यांची आक्रमकता किती आवडेल हा प्रश्न आहे.मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं ५० टक्के जागांची मागणी केल्याचं शिवसेना उबाठातील सूत्रं सांगतात. ही मागणी उद्धवसेनेला मान्य नाही. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव यांच्या नेतृत्त्वातील एकसंध शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या होत्या. तर मनसेला केवळ ७ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. हा फरक मोठा असल्यानं उद्धवसेना ५० टक्के जागा मनसेला सोडण्यास तयार नाही.

दोन्ही ठाकरेंच्या पक्षांचे प्रभाव असलेले मुंबईतील प्रभाग सारखेच आहेत. गिरगाव, दादर, वरळी, प्रभादेवी, चेंबूर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड यांच्यासोबतच पश्चिम उपनगरात दोन्ही पक्षांचं प्राबल्य आहे. इथले अनेक प्रभाग कित्येक वर्षे सेनेकडे राहिलेले आहेत. सेनेच्या याच गडांना २०१२ मध्ये मनसेनं सुरुंग लावला आणि पालिका निवडणुकीत २८ जागा जिंकल्या. यातल्या बहुतांश जागा शिवसेनेनं २०१७ च्या निवडणुकीत जिंकल्या. याच जागा युतीच्या बोलणीत कळीच्या ठरु शकतात. हक्काच्या जागा सोडण्याची तयारी कोण दाखवणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे. इथेच ठाकरेंची कसोटी लागेल आणि त्यांचं भवितव्य ठरेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!