अकोला दिव्य न्यूज :चंद्रभागेच्या तिरी.. पहा मंदिरी तो पहा विटेवरी… विठ्ठल विठ्ठल जयहरी…दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी.. विठ्ठल विठ्ठल जयहरी… असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरासोबतच महाराष्ट्रातील गाव खेड्यात प्रत्येक घरादारात आणि शहरात पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या मंगल पर्वावर संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरसात न्हालेले आहे.

विठूनामाच्या गजरात भक्तिचा अनुपम सोहळा रंगला असून अकोला शहरातील जुने शहरात असलेल्या प्राचीन विठ्ठल मंदिरात परंपरागत पद्धतीने महापुजा करण्यात आली. शहराच्या कानाकोपऱ्यातून सावळ्या विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे. मंदिर परिसरात सकाळपासूनच विठ्ठूराया जय घोष करीत सावळ्या हरीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी ओसंडून वाहत आहे. यासोबतच शहरातील इतर विठ्ठल रखुमाई मंदिरात भाविकांनी हरीनामाचा गजर करीत, सर्वसामान्यांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.

आज रविवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा केली.”यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून कैलास दामू उगले (वय ५२ वर्षे) आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले (वय ४८ वर्षे) मु. पो. जातेगांव, ता. नांदगाव जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. दाम्पत्य गेल्या १० ते १२ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. कैलास यांचे वडील माजी सैनिक आहेत.

शेकडो किलोमीटरचे अंतर पायी चालत निघालेल्या संतांच्या पालख्या शनिवारी पंढरीत पोहोचल्या. वैष्णवांची मांदियाळी आणि हरिनामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली. आज आषाढी एकादशीसाठी राज्य आणि परराज्यातून तब्बल १५ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांचे पालखी सोहळे रात्रीच वाखरी मुक्कामी दाखल झाले होते. आज सकाळी या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अखेरचा रिंगण सोहळा वाखरी येथे पार पडला.

त्यानंतर संत मुक्ताई आणि संत नामदेव महाराज यांच्यासह मानाच्या पालख्या वाखरी येथे दाखल झाल्या. सर्व संतांची भेट झाली. त्या नंतर क्रमाक्रमाने पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी येथून पुढे भाटे यांच्या रथातून मार्गस्थ झाली. पंढरपूरच्या जवळ आल्यावर सरदार शितोळे यांनी माउलींच्या पादुका गळ्यात घेत मार्गक्रमण केले.
