अकोला दिव्य न्यूज : बिहारची राजधानी पाटणामधील प्रसिद्ध व्यावसायिक आणि भाजपाशी संलग्न असलेल्या गोपाल खेमका यांची त्यांच्या निवासस्थानाबाहेर रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे खेमका यांना गोळ्या घालण्यात आल्या तो थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काळे हेल्मेट आणि निळा शर्ट घातलेला एक दुचाकीस्वार खेमका यांच्या निवासस्थानाच्या बाहेर वाट पाहत थांबला होता असे सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. खेमका यांची कार आणि दुसरी एक गाडी गेट बंद असल्याने घराच्या गेटच्या बाहेरच थांबली होती, हीच संधी साधून पहिल्या कारच्या ड्रायव्हर सीटवर बसलेल्या खेमका यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, आणि हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला.

व्हिडीओमध्ये गार्ड घरातून गेटकडे चालत जाताना दिसून येत आहे. पण त्याने दरवाजा उघडला असता खेमका हे मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. तसेच खेमका यांच्या गाडीच्या मागे असलेल्या दुसऱ्या वाहनातील एक पुरूष आणि महिला त्यांच्या गाडीतून गडबडीत बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. या घटनेत खेमका यांचा जागेवरच मृत्यू झाला होता असे पोलिसांनी सांगितले.

गांधी मैदान पोलिस स्टेशन परिसरातील पनाशे हॉटेलजवळ असलेल्या त्याच्या घराच्या बाहेर ही हत्येची घटना घडली. खेमका हे ट्विन टॉवर सोसायटीमध्ये राहत होते. घटनास्थळावरून एक गोळी आणि एक शेल जप्त करण्यात आले आहे. ४ जुलैच्या रात्री जवळपास ११ वाजता आम्हाला गांधी मैदानाच्या दक्षिण भागात उद्योजक गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या झाल्याची माहिती मिळाली.माहिती मिळाल्याबरोबर पोलिस रुग्णालयात आणि घटनास्थळी पोहचले.

परिसराला घेराव घालण्यात आला आहे आणि तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पुढील कारवाई केली जाईल, असे एसपी, दीक्षा यांनी सांगितले.

पोलिसांनी घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे आणि गुन्ह्याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.धक्कादायक बाब म्हणजे, सहा वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये हाजीपूरमध्ये गोपाल खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका याचीही अशाच प्रकारे हत्या झाली होती.

डिसेंबर २०१८ मध्ये गोपाल खेमका यांचे सुपुत्र गुंजन खेमका यांची हाजीपूर औद्योगिक केंद्रात असलेल्या त्यांच्या कारखान्याच्या गेटबाहेर हत्या झाली होती. सहा वर्षात आता वडिलांचीही अशाच प्रकारे हत्या झाल्यामुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.
