अकोला दिव्य न्यूज : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांच्या हस्ते अखिल भारतीय लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे यांचा सत्कार करण्यात आला. विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असल्याबद्दल डॉ. कमलताईंच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन हा सत्कार करण्यात आला.

राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था आसेगाव पूर्णा व अ. भा. लोक स्वातंत्र पत्रकार महासंघ अमरावती जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष संजय सरवटकर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथपिंडक बुद्ध विहार पूर्णा नगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भदंत बुद्धघोष महाथेरो, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कमलताई गवई, अ.भा.लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, राष्ट्रीय सचिव राजेंद्र देशमुख, केंद्रीय पदाधिकारी तथा युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे, अमरावती जिल्हा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय बी. देशमुख तसेच अतिथी म्हणून उद्योजक राहुल वाकपैंजण,अख्तर काझी, अँड दीपक सरदार उपस्थित होते.
प्रारंभी भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे अतिथींच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सरवटकर यांनी केले. डॉ. कमलताई गवई, संजय देशमुख, प्रदीप खाडे यांचीही याप्रसंगी समयोचित भाषणे झालीत. या कार्यक्रमाचे निमित्ताने शाहू, फुले, आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सामाजिक कार्यकर्ता, या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन वाय. एम. रामटेके तर आभार प्रदर्शन भारत वरठे यांनी केले. कार्यक्रमाला लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे चांदूरबाजार, धामणगाव रेल्वे, अचलपूर, परतवाडा येथील पदाधिकारी व इतरही नागरिक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते