अकोला दिव्य न्यूज : एका उच्च शिक्षित व्यक्तीने भर वाहतुकीच्या मार्गावर स्वतःला पेटवून घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्वतःला पेटवून घेणाऱ्या इसमाची प्रकृती गंभीर असून अकोला येथे उपचारदरम्यान मृत्यूशी झुंज देत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा ते जळगाव जामोद मार्गावर ही दुर्दैवी घटना घडला आहे. नांदुरा ते जळगाव या रस्त्यावरील आलमपुर फाट्यावर आज नेहमीप्रमाणे प्रवासी, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, फाट्यावरील लहान सहान दुकानें ग्राहकांनी गजबजलेली होती.

कामधंद्याची वेळ असल्याने अप डाऊन करणारे कर्मचारी, कामगार, विद्यार्थी याने आलमपूर फाटा गर्दीने फुलला होता. या धामधूमीत एका व्यक्तीने सोबत आणलेले पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले.अचानक झालेल्या प्रकाराने उपस्थित गावकरी, प्रवासी थक्क झाले.यावेळी उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवून आग विझविली. दरम्यान काहींनी पेटलेल्या व्यक्तीच्या अंगावर पाण्याचा मारा केला. त्यामुळे काही वेळाने आग विझली. मात्र तोपर्यंत इसम गंभीररित्या भाजल्या गेला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
गंभीर भाजलेल्या इसमाला उपचारासाठी अगोदर खामगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यूशी झुंज देत असलेल्या या इसमाचे नांव डॉ. चंदू पाटील असं असून तो जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवासी आहे. असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. तो पशु वैद्यकीय कर्मचारी असून कौटुंबिक कलहातून या डॉक्टरने भर रस्त्यावर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.