अकोला दिव्य न्यूज : शिक्षणाचं बाजारीकरण होऊनही आजही शिक्षकांना परब्रह्माचा मान दिला जातो.पण काही मानसिक विकृत शिक्षकांमुळे शिक्षकी पेशा डागदार झाला आहे. आज गुरूपौर्णिमा साजरी केली जात असताना, काल बुधवारी म्हणजे गुरूपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला एका शाळेतील प्राचार्य व शिक्षकांनी विकृतीचा कळस गाठला. जवळपास १२५ च्यावर विद्यार्थींनींचा चक्क गणवेश काढून आज गुरूपौर्णिमा उत्सवावर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

शहापूर येथील एका नामांकित शाळेमधील स्वच्छतागृहात रक्त सांडल्याचे दिसल्याने मासिक पाळी कोणत्या विद्यार्थीनीला आली आहे हे तपासण्यासाठी सहावी ते दहावीच्या सव्वाशे विद्यार्थिनींचे गणवेश काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थीनींनी हा प्रकार घरी येऊन अक्षरश: रडत पालकांसमोर कथन केला. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.

या घटनेनंतर संतापलेल्या पालकांनी शाळा व पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्राचार्यांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राचार्य आणि एका कर्मचारीला अटक केली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासही घाबरत असल्याचा आरोप पालकांनी केला.

शहापूर येथे नर्सरी ते दहावी पर्यंतची शाळा असून या शाळेत सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. मंगळवारी शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग सांडल्याचे दिसल्याने ते नेमके कुठल्या विद्यार्थिनींचे आहेत. याबाबत शाळेच्या प्राचार्यांनी विचारणा केली. या गंभीर प्रकाराने धास्तावलेल्या मुली एकदम स्तब्ध झाल्याने प्राचार्यांनी शाळेमधील महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सहावी ते दहावीच्या सुमारे सव्वाशे विद्यार्थिनींचे गणवेश काढून त्यांची तपासणी केली.

विशेष म्हणजे शाळेमध्ये पाण्याचा अभाव असल्याने मुलींनी भिंतीला पुसलेल्या रक्ताचे डाग प्रोजेक्टर मधून सर्व विद्यार्थ्यांना दाखवले. विद्यार्थिनींच्या बोटाचे ठसे ही घेतले असल्याचा आरोप पालकांनी केला.

या गंभीर प्रकारामुळे मुलींनी घरी येऊन अक्षरशः रडत रडत पालकांकडे झाला प्रकार कथन केला. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी एकत्र येऊन बुधवारी सकाळी शाळा गाठून प्राचार्यांना घेराव घालत जाब विचारला. पालकांचा संताप पाहून प्राचार्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे शाळा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

शहापूरचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यांसह पोलिसांनी संस्थाचालकांना मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संस्थाचालकांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर पालकांनी आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला. तेथे शाळेविरोधात घोषणा करत ठिय्या मांडण्यात आला. दरम्यान, संस्थाचालकांसोबत घटनेबाबत बोलणे झाले असून प्राचार्यांना बडतर्फ करण्याबाबतचे पत्र पाठवत असल्याचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी स्पष्ट केले.

तसेच प्राचार्यांविरोधात नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शाळेमधील या बीभत्स प्रकारामुळे मुलींच्या मनस्वास्थ्यावर परिणाम झाल्याचा आरोप करीत त्या शाळेमध्ये जाण्यास घाबरत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच शहापुर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्याचे स्पष्ट केल्यानंतर संतप्त पालक शांत झाले.

पालकांच्या आंदोलनानंतर अखेर याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्राचार्य हिच्यासह आठजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी प्राचार्य आणि एका कर्मचारीला अटक केली आहे.
