अकोला दिव्य न्यूज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृह जिल्हा नागपूर येथे उड्डाणपूल, रेल्वे भुयारी मार्ग, सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्यात येत आहेत. ही उत्तम दर्जाची असावे असे या नेत्यांना अपेक्षित असेल, परंतु अलीकडच्या घटना बघता गुणवत्तेच्या नावाने बोंब आहे. मंत्री बावनकुळेच्या मतदारसंघात उद्घाटनासाठी सज्ज उड्डाणपूल पावसामुळे खचला आहे.

उड्डाणपूल बांधून तयार झाला आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामठी ते न्यू कामठीला ओडणाऱ्या उड्डाणपुलावर मंगळवारच्या पावसामुळे मोठमोठे खड़े पडले असून, काही भाग खचला.या उड्डाणपुलावरून रहदारी सुरू झाली असती तर मोठी दुर्घटना झाली असती.

सुदैवाने उद्द्घाटन न झाल्याने ती टळली आहे. मोठमोठे खड्डे पडलेल्या पुलाचा व्हिडीओ एका नागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये पुलाचा काही भाग खोलवर बसलेला स्पष्ट दिसतो. यामुळे बांधकामाच्या दर्जाचाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

विकासाच्या नावाखाली नागपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. मात्र बांधकामाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळेच उड्डाणपूल उद्द्घाटन होण्यापूर्वीच खचला असून त्यावर खड्डा पडला आहे.हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा पुढे आला आहे. सार्वजनिक पैशातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांमध्ये अशी अनियमितता होत असल्याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

हा सार्वजनिक निधीचा अपव्ययच नाही, तर हा लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा संतप्त सवाल नागरीकांकडून केला जात आहे.

या पुलाचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित कंत्राटदाराला काल्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी होत आहे. याकडे शासनाने दुर्लक्षित केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. पायाभूत सुविधांच्या विकासकामात पारदर्शकता असावी मागणी होत आहे.पूल वापरात आला असता, मोठी दुर्घटना घडली असती, सुदैवाने ती टळली.

निकृष्ट बांधकामामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
