अकोला दिव्य न्यूज : Sanjay Shirsat Property : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील व्हिटस् हॉटेल प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर खळबळजनक आरोप होत आहे. त्यातच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आता संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे खुद्द संजय शिरसाट यांनीच आयकर विभागाकडून नोटीस आल्याची जाहीर कबुली एका कार्यक्रमात दिली आहे.

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील वेदांत म्हणजेच विट्स हॉटेलच्या लिलावावरून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आरोपानुसार, विट्स हॉटेलची बाजारभावानुसार किंमत सुमारे 110 कोटी रुपये असताना, संजय शिरसाट यांच्या मुलाने ते केवळ 67 कोटी रुपयांत विकत घेतले, अशी टीका विरोधकांनी केली होती.

पाच वर्षात 13 पटींनी संपत्ती वाढली
या वादानंतर, संजय शिरसाट यांनी या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केले. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा सोडला नाही आणि तो पावसाळी अधिवेशनात सभागृहात उचलून धरला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे जाहीर केले होते. यानंतर आता संजय शिरसाट यांनी आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी 2024 सालच्या विधानसभा विधानसभा निवडणुकीवेळी संपत्तीचे विवरणपत्र सादर केले होते. यात त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात एकूण 13 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात संजय शिरसाट यांची एकूण संपत्ती किती?

संजय शिरसाट यांची संपत्ती (Sanjay Shirsat Property)
जंगम संपत्ती
2019 मध्ये 1.21 कोटी
2024 मध्ये 13.37 कोटी
स्थावर संपत्ती
2019 मध्ये 1.24 कोटी
2024 मध्ये 19.65 कोटी
सोने
2019 मध्ये 16 कोटी
2024 मध्ये 1.42 कोटी
ठेवी
2019 मध्ये 5 लाख
2024 मध्ये 81 लाख
वाहने
2019 मध्ये 85 लाख
2024 मध्ये 18 लाख
संजय शिरसाट यांची जाहीर कबुली
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली दिली. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असे विधान त्यांनी केले. तसेच हे वक्तव्य माझ्यासाठीच असल्याचेही देखील त्यांनी म्हटले. 2019 साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती, तर 2024 साली तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असं विचारल्याचे देखील संजय शिरसाट म्हणाले. याबाबत त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्याबाबत सांगितलं होतं. पैसे कमावणे सोपं आहे. मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं वक्तव्य देखील संजय शिरसाट यांनी केले होते.

आयकर विभागाच्या नोटीसीला उत्तर देणार : संजय शिरसाट
संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, एजन्सीला जी माहिती हवी आहे, ती माहिती आम्ही देणार आहोत. त्यांना वाटत आहे की, आधीची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीमध्ये माझी संपत्ती कशी वाढली? त्यांना जे जे प्रश्न पडले आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एजन्सीला देणार आहे.

मला अलीकडेच ही नोटीस आली आहे. नऊ तारखेला मला या सगळ्यावर उत्तर द्यायचं होतं. पण, मी त्यासाठी वेळ मागितला आहे. आम्हाला सुद्धा यंत्रणांच्या नोटीस येतात किंवा त्यांची कारवाई होते. आत्ताच ही नोटीस का आली? हे माहित नाही. पण, जर नोटीस आली असेल तर त्याचं उत्तर द्यावं लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
