Sunday, July 13, 2025
HomeUncategorized9 दिवसात 2 खून ! भाजप नेत्याची गोळी घालून हत्या

9 दिवसात 2 खून ! भाजप नेत्याची गोळी घालून हत्या

अकोला दिव्य न्यूज : BJP leader Surendra Kewat shot dead : बिहारच्या पाटणामध्ये ४ जुलै रोजी व्यावसायिक तथा भाजपाशी संलग्न असलेल्या गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, ही घटना ताजी असतानाच आता पाटणा येथील शेखपुरा गावातील भाजपाचे पदाधिकारी सुरेंद्र केवट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सुरेंद्र केवट यांची बिहटा-सरमेरा या महामार्गालगत शेती आहे. त्या शेतीजवळच दुचाकीस्वारांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर केवट यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

वृत्तानुसार, केवट हे पाण्याचा पंप बंद करण्यासाठी बिहटा-सरमेरा राज्य महामार्गालगत असलेल्या त्यांच्या शेतावर गेले होते. मात्र, शेतावरून पुन्हा परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी केवट यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या गोळीबारात केवट हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. केवट यांचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. वृत्तानुसार, सुरेंद्र केवट हे स्थानिक पातळीवर पशुवैद्य आणि शेतकरी म्हणून ओळखले जात होते. ते शेखपुरा गावात त्यांच्या कुटुंबासह राहत होते. तसेच ते भाजपाचे पदाधिकारी होते.

तेजस्वी यादव यांची बिहार सरकारवर टीका
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर पाटण्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, पाटणामध्ये एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या झाली. काय बोलावे आणि कोणाला? एनडीए सरकारमधील कोणी सत्य ऐकण्यास किंवा त्यांच्या चुका मान्य करण्यास तयार आहे का? मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल सर्वांना माहिती आहे, पण भाजपाचे दोन निरुपयोगी उपमुख्यमंत्री काय करत आहेत?, अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!