शुभांशू शुक्ला हे ४१ वर्षांनंतर अंतराळ स्थानकात गेलेले पहिले भारतीय आहेत.
अकोला दिव्य न्यूज : Shubhanshu Shukla Update : तब्बल ४१ वर्षांनंतर पुन्हा एक भारतीय अंतराळात जाऊन आता पृथ्वीवर परत येतो आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या तीन सहकारी अंतराळवीरांची आज मंगळवार १४ जुलैला सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) पृथ्वीच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. सुमारे २३ तासांच्या प्रवासानंतर, हे अंतराळयान १५ जुलैला दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर स्प्लॅशडाउन होणार आहे.

शुभांशू शुक्ला हे अॅक्सियम-4 मोहिमेचा भाग होते. ही एक खाजगी मोहिम असली तरी यामध्ये नासा, स्पेसएक्स आणि भारताची इस्रो संस्थाही सहभागी आहे. या मोहिमेसाठी भारताने ५४८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही मोहिम २५ जूनला सुरू झाली होती आणि २६ जूनला दुपारी ४ वाजून १ मिनिटने शुभांशू व इतर अंतराळवीर ISS वर पोहोचले होते.
अंतराळातील १७ दिवसांच्या या काळात शुभांशू शुक्ला यांनी तब्बल ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले. त्यात भारतातील सात प्रयोगांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्यांनी अवकाशात मेथी आणि मूगाच्या बिया उगविल्या. ‘स्पेस मायक्रोअल्गी’ या प्रयोगातही त्यांचा सहभाग होता. हाडांच्या आरोग्यावर अवकाशाचा प्रभाव काय होतो, याचाही त्यांनी अभ्यास केला.

तरुणांना प्रेरणा देणारे शुभांशू
अंतराळात असूनही शुभांशू विद्यार्थी संवादासाठी सज्ज होते. ३, ४ आणि ८ जुलै रोजी तिरुअनंतपुरम, बेंगळुरू आणि लखनऊ येथील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांशी हॅम रेडिओद्वारे थेट संवाद साधण्यात आला. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) विषयातील करिअरसाठी हे संवाद प्रेरणादायी ठरले.
६ जुलैला शुभांशूने इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या प्रयोगांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि भारताच्या गगनयान मोहिमेतील संभाव्य भूमिकेवर चर्चा केली. तसेच त्यांनी ISS वरील क्युपोला मॉड्यूल मधून पृथ्वीचे अनेक सुंदर फोटो घेतले, हे मॉड्यूल सात खिडक्यांमधून अवकाश आणि पृथ्वीचे दर्शन घडवते.
१९८४ मध्ये राकेश शर्मा हे अंतराळात गेले होते. त्यानंतर ४१ वर्षांनंतर शुभांशू शुक्ला यांनी ही कामगिरी बजावली आहे. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय आहेत. हा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गगनयान ही भारताची स्वदेशी मानवी अंतराळ मोहीम असून, ती २०२७ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे.