अकोला दिव्य न्यूज : डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यानंतर या वर्षी २० जानेवारीपासून अमेरिकेने १,५६३ भारतीय नागरिकांना हद्दपार केले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

या वर्षी २० जानेवारीपासून कालपर्यंत सुमारे १,५६३ भारतीय नागरिकांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे.यापैकी बहुतेक भारतीय नागरिकांना व्यावसायिक विमानाने परत पाठवण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मार्चमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट अधिकाऱ्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या २९५ व्यक्तींबद्दल माहिती दिली आहे. या सर्वांना अमेरिकेतून बाहेर काढण्याचे अंतिम आदेश आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत यापूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, २०१७ ते २०२१ या कालावधीत ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेने ६,१३५ भारतीयांना हद्दपार केले होते. २०१९ मध्ये सर्वाधिक भारतीयांना हद्दपार करण्यात आले होते, ज्यामध्ये २,०४२ भारतीय नागरिकांचा समावेश होता. याचबरोबर २०१७ मध्ये १,०२४, २०१८ मध्ये १,१८० आणि २०२० मध्ये १,८८९ इतक्या भारतीयांना हद्दपार करण्यात आले होते.
याउलट, जो बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात, हद्दपार केलेल्या भारतीय नागरिकांची संख्या सुमारे ३,००० पर्यंत घसरली होती. ट्रम्प प्रशासनाने त्यांच्या पहिल्या कार्यकाळात बेकायदेशीर स्थलांतरितांवर आक्रमक कारवाई सुरू केली होती. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या मते, २०१७ मध्ये ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या महिन्यात अमेरिकेने ३७,६६० स्थलांतरितांना हद्दपार केले होते. सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेने हद्दपार करण्यासाठी १८,००० कागदपत्रे नसलेल्या भारतीयांची यादी तयार केली आहे.