अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्हा न्यायालय परिसरातच न्यायालयातील एका महिला न्यायाधीशांचा दालनासमोर कर्तव्यावर असलेल्या शिपाई यांच्यासोबत शाब्दिक वाद करून त्यांच्यासोबत झटापट करीत आरोपी वकीलाने बळजबरीने न्यायाधीशांचा दालनात प्रवेश केला आणि विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर न्यायालयात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वकील तेलगोटे यास रामदासपेठ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपी वकिलास २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेतील आरोपी वकील सौरभ दीपांकर तेलगोटे (३५) रा. कौलखेड हा गेल्या अनेक दिवसांपासून अकोला न्यायालयातील एका महिला न्यायाधीश यांचा पाठलाग करीत होता. त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहणे, त्यांच्यावर वाईट नजर ठेवणे, दालन व न्यायालयासमोर वारंवार चकरा मारणे असे प्रकार आरोपी वकील याचे नित्याचेच झाले होते.एवढेच नव्हे तर न्यायाधीश महिला घरी जात असताना त्यांच्या रस्त्यामध्ये उभे राहणे, वाहनतळामध्ये काम नसतानादेखील आरोपी वकील त्यांचा पाठलाग करीत निवासस्थानापर्यंत जाणे, तिथे समोर थांबणे, कारण नसताना शिपाई यांच्यासोबत चर्चा करत त्यांना भेटण्यासाठी आग्रह करून त्यांच्यासोबत शाब्दिक वाद करीत होता.
वकील सौरभ तेलगोटेला वारंवार ताकीद दिल्यानंतरसुध्दा त्यांच्या स्वभाव व वागणुकीमध्ये कोणताही बदल झाला नाही. तर आरोपी वकिलांच्या या कृत्याची कुणकुण लागताच अनेकांनी समज दिली. दोन वकिलांनी काही दिवसांपूर्वी त्याला चोप दिला होता.
मात्र हा प्रकार एवढ्यावरच न थांबता तेलगोटे याने न्यायाधीश यांच्या इंस्टाग्रामवर फॉलो करून वेगवेगळ्या अकाउंटद्वारे वेळोवेळी मॅसेजेस करून अपमानास्पद, मानहानीकारक व चारित्र्य हनन करण्यासारख्या पोस्ट केल्यात. वकील सौरभ तेलगोटेला वारंवार ताकीद दिल्यानंतरसुध्दा त्यांच्या स्वभाव व वागणुकीमध्ये कोणताही बदल झाला नाही. तर आरोपी वकिलांच्या या कृत्याची कुणकुण लागताच अनेकांनी समज दिली. दोन वकिलांनी काही दिवसांपूर्वी त्याला चोप दिला होता. पण वकील सौरभ तेलगोटेने हे गैरकृत्य बंद केले नाही तर उलट न्यायाधीशांचा न्यायालयीन दालनासमोर कर्तव्यावर असलेल्या शिपाई सोबत शाब्दिक वाद करून झटापटी करीत जोर जबरदस्तीने न्यायाधीशांचा दालनात घुसण्याचा आरोपी वकीलाने प्रयत्न केल्याने अखेर रामदासपेठ न पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत वरील सर्व बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी न्यायाधीश यांनी रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर आरोपी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांला अटक करण्यात आली आहे.
न्यायाधीशही सुरक्षित नाही !
आरोपी वकिलाने न्यायाधीश यांचा विनयभंग केल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली. या प्रकारामुळे न्यायाधीशसुध्दा सुरक्षित नसल्याचे झालेल्या घटनेवरून अधोरेखित होत आहे. त्यामुळे ही बाब चिंतेचा विषय बनल्याचे बोलल्या जात आहे.
या कलमान्वये केले गुन्हे दाखल !
पोलिसांनी आरोपी सौरभदीपांकर तेलगोटे (३५) रा. कौलखेड याच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ७४,७५,७८, १३२, ३५२, ३५१ (२), ३५१ (३) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (सी), ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.