अकोला दिव्य न्यूज : उत्तर प्रदेशमधील योगीराजमध्ये नोकरशाही एवढी मुजोर झाली आहे की, आता आमदाराच्या नातेवाईकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुकानावर बुलडोझर चालविला आहे. आग्रा शहरामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपा आमदार भगवान सिंह कुशवाहा यांचे काका जगदीश कुशवाहा यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे. जगदीश सिंह कुशवाहा यांच्या मिठाईच्या दुकानावर सुरुवातीला १ हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून ३ हजार रुपये घेण्यात आले. एवढंच नाही तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जगदीश यांना रस्त्यावर ढकलून लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या दुकानावर बुलडोझर चालवण्यात आला. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पालिकेच्या सेनेटरी विभागाचे कर्मचारी सिंगल यूज प्लॅस्टिक विरोधात अभियान चालवत असताना सेनेटरी इन्स्पेक्टर प्रदीप गौतम हे भाजपा आमदाराचे काका जगदीश कुशवाहा यांच्या मिठाईच्या दुकानावर पोहोचले. दुकानामध्ये प्लॅस्टिकची ग्लास आढळल्याने त्यांनी एक हजार रुपयांचा दंड ठोकावला. मात्र त्यांच्याकडून ३ हजार रुपये घेण्यात आले. जगदीश कुशवाहा यांनी याला आक्षेप घेतला. त्यावरून वादाला तोंड फुटले. थोड्याच वेळात पालिकेचे इतर कर्मचारीही तिथे पोहोचले. तसेच त्यांनी दुकानदार कुशवाहा यांना धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेनंतर भाजपा आमदार भगवान सिंह कुशवाहा यांनी घटनेचं गांभीर्य विचारात घेऊन कुटुंबीयांसह शाहजंग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सेनेटरी इन्स्पेक्टर प्रदीप गौतम, प्रताप नामक अन्य व्यक्ती व २० अज्ञात लोकांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या पडताळणीसह तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. या प्रकरणी कुणालाही सोडलं जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.