अकोला दिव्य न्यूज : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी पालकांनी पाल्याला बुद्धिबळ खेळाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले.आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाच्या शुभेच्छा देताना आपण स्वतः एक आंतरराष्ट्रीय मानांकित चेस खेळाडू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक चांडक यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

अकोला महानगर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन व प्रभात किड्स स्कूल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून वाशिम रोड स्थित प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक चांडक यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक चांडक यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सनदी लेखापाल आणि लेखक मनोज चांडक, राष्ट्रीय कॅरम असोसिएशनचे सदस्य प्रभजीतसिंग बछेर, अकोला महानगर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पुंडकर, सचिव जितेंद्र अग्रवाल, ऑर्बिटर दीपक चव्हाण मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. नारे यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभातचे क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल मांदाळे, विभाग उपप्रमुख आशिष बेलोकार आणि संपूर्ण क्रीडा विभाग व अकोला महानगर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.