अकोला दिव्य न्यूज : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी विरोधी पक्ष आणि विविध शेतकरी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही याच मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. अशातच, बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

एका शेतकरी दाम्पत्याने आपल्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेवर प्रकाश टाकला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या भरोसा गावात गणेश थुट्टे (वय ५५) आणि त्यांच्या पत्नी रंजना थुट्टे (वय ५०) या शेतकरी दांपत्याने आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पती-पत्नीचे मृतदेह शेजारी-शेजारीच एकाच झाडाला लटकलेले पाहून संपूर्ण गाव सुन्न झाले असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
थुट्टे दांपत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शेतीत सातत्याने होणारे नुकसान आणि हुमणी अळीमुळे पिकांवर आलेले संकट, यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते अशी चर्चा गावात सुरु आहे. याच नैराश्यातून त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पाऊस सुरू असतानाच ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली, त्यामुळे अंढेरा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत पती-पत्नीचे पार्थिव झाडावरून खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.