अकोला दिव्य न्यूज : सांगलीमध्ये एका तरुण ठेकेदाराने कर्जाच्या ओझ्याखाली आणि शासनाकडून कामाचे बिल वेळेवर न मिळाले नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच वाशिम जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात मोठा घोटाळा उघड झाला आहे. कंत्राटदार कंपनीच्या फायद्यासाठी बांधकाम विभागातील एका अभियंत्याने बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित अभियंत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिम शहरातील विकासकामांबाबत तक्रारदार राम पाटील डोरले यांनी मे. अजयदीप इन्फ्रा या कंपनीविरोधात गंभीर आरोप करत ती कंपनी काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. कंपनीवर वेळेत कामे पूर्ण न करणे आणि निकृष्ट दर्जाचे काम करणे, तसेच वारंवार मुदतवाढ घेणे असे आरोप होते. मात्र, संबंधित प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे राम डोरले यांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पोहरादेवी येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमात आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखले.
या प्रकरणाला वेगळे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिनकर नागे यांनी एक बनावट पत्र तयार केल्याचे उघड झाले. या पत्रात राम डोरले यांची खोटी सही आणि चुकीचं नाव वापरून, त्यांनी आपली तक्रार मागे घेतल्याचे भासवण्यात आले. विशेष म्हणजे हे बनावट पत्र मंत्रालयातील उपमुख्य सचिवांच्या नावाने सादर करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण प्रकरण गंभीर बनले आहे.या प्रकारामुळे प्रशासनातील भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रांचा वापर आणि तक्रारदाराच्या न्यायहक्कावर झालेला आघात यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राम डोरले यांच्यासारख्या सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर अशा प्रकारे पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
वाशिम शहरातील विकासकामांमध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी तक्रारदार राम पाटील डोरले यांनी एक गंभीर आरोप करत, खोट्या कागदपत्रांच्या आधारे ठेकेदाराच्या बाजूने संगनमताने फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल केली आहे.
अभियंत्यावर गुन्हा दाखल
या तक्रारीच्या आधारे वाशिम पोलिसांनी अभियंता दिनकर नागे आणि लिपिक प्रिया तुपलोढे यांच्याविरोधात 23 जुलै 2025 रोजी गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318 (3), 336 (2)(3), 340 (2), आणि 3 (5) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाशिम शहर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी दिली.