• यंदा रौप्य महोत्सव वर्ष – कर्माला भक्तीची जोड देणारी वारी
• अकोला अर्बन बँक कर्मचार्यांचे आयोजन
अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील अग्रगण्य आणि मल्टिस्टेट शेड्युल बॅकेचा दर्जा असणाऱ्या दि.अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या अकोला ते शेगाव पायदळ वारीला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. ही वारी म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर श्रद्धा, निष्ठा आणि एकात्मतेचं जिवंत प्रतीक बनली आहे.वर्षातून एकदा निघणाऱ्या या वारीचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून उद्या शनिवार दि. 26 जुलै रोजी सकाळी 7 वाजता ही पायदळ वारी डाबकी रोड येथील अनोखा मंदिर येथून निघणार आहे.

२००१ साली गजानन रेलकर यांनी ही मूळ संकल्पना मांडली आणि त्यानंतर स्व.ए.बी. देशपांडे, राम पत्की, हेमंत थोरात, नागोराव माहोरे, विनोद अग्रवाल, यांनी स्वतःच्या मनातून आणि श्रद्धेतून या वारीचा प्रारंभ केला. त्यावेळी कोणतीही घोषणा, प्रसिद्धी किंवा मोठं नियोजन नव्हतं. होता तो फक्त श्री गजानन महाराजांवरील निस्सीम भक्तिभाव आणि चालत जाण्याची निर्धार.
या छोट्याशा उपक्रमाला २५ वर्षांचा प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवास लाभला आहे. आज ही वारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची, त्यांच्या कुटुंबियांची, असंख्य वारकऱ्यांची आणि अकोल्यातील विविध स्नेही नागरिकांचा सहभागातून सामूहिक वारी झाली आहे. या वारीमुळे बँकेच्या सेवकांमध्ये केवळ आध्यात्मिक ऊर्जा वाढलेली नाही, तर परस्पर संबंधही अधिक घट्ट झाले आहेत. या उपक्रमात बँकेचे सर्व स्तरांतील कर्मचारी आणि त्यांचे परिवार सहभागी होणार असून, या यात्रेद्वारे सामाजिक बांधिलकीही जोपासली जाणार आहे.
श्री गजानन महाराजांच्या पावन भूमीकडे नेणारी ही वारी केवळ पायांनी चालत जाण्याची यात्रा नाही, ती अंतःकरणातील विश्वासाची, भक्तीची आणि सेवाभावाची चाल आहे. २५ वर्षांचा हा प्रवास म्हणजे श्रद्धेने सुरु झालेल्या संकल्पाची यशोगाथा आहे. या वारीने दि अकोला अर्बन बँकेच्या कार्यसंस्कृतीत एक वेगळीच उर्जा निर्माण केली आहे.