Thursday, July 31, 2025
HomeUncategorizedLive ! पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला ऐतिहासिक बाळापूर किल्ल्याचा बुरुज

Live ! पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला ऐतिहासिक बाळापूर किल्ल्याचा बुरुज

अकोला दिव्य न्यूज : ऐतिहासिक व पुरातन वास्तू भारताच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत असतात. त्याचे जतन व संरक्षण करण्यात दुर्लक्ष होत असल्याने या पुरातन वास्तुंपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर शहरातील ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. काही दिवसांमध्ये बाळापूरमध्ये प्रचंड पाऊस झाला. त्या पावसाचा फटका किल्ल्याला बसला आहे. सततच्या पावसामुळे हा भाग खचून पडला. बुरुज ढासळला त्यावेळी परिसरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. किल्ल्याच्या देखभालीकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांसह इतिहास प्रेमी व संशोधकांकडून केला जात आहे.

बाळापूर शहरात ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याच्या परिसरातच राज्य शासनाच्या उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाचे कामकाज चालते. किल्ल्याच्या बाजूने नद्यांचा मोठा प्रवाह वाहतो. गेल्या काही दिवसांमध्ये बाळापूर शहरासह तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नद्यांना मोठा पूर आला होता. या पावसामुळे शिकस्त झालेल्या किल्ल्याच्या बुरुजावर मोठा दुष्परिणाम झाला. किल्ल्याच्या बुरुजाला अगोदरच भेगा पडलेल्या होत्या. त्यातच पावसाचे पाणी देखील साचले होते. तो बुरुज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.


ऐतिहासिक किल्ल्याची अशा प्रकारे होणारी वाताहत पाहून इतिहास प्रेमी व संशोधकांनी खंत व्यक्त केली. हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असतानाही त्याच्या दुरुस्ती आणि संरक्षक उपाययोजनांकडे गंभीरपणे लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. या घटनेनंतर किल्ल्याच्या उर्वरित भागांची तातडीने पाहणी करून संरक्षक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली जात आहे. किल्ल्याच्या पुनरुत्थानासाठी विशेष निधी उभारुन त्याचे जतन करण्याच्या मागणीने जोर पकडला.

ऐतिहासिक किल्ला १७५७ मध्ये पूर्णत्वास

माण आणि मस नद्यांच्या संगमावर १७२१ मध्ये सम्राट औरंगजेबाचा मुलगा आझम शाह याने किल्ल्याच्या बांधणीला सुरुवात केली. १७५७ मध्ये एलिचपूर (आताचे अचलपूर, अमरावती जिल्हा) च्या नवाब इस्माईल खानने तो पूर्ण केला. नद्यांच्या मधोमध उंच जमिनीवरील किल्ल्याला त्याच्या काळातील उत्कृष्ट वीटकामाने बांधलेल्या अतिशय उंच भिंती आणि बुरुज आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे आहेत. प्रत्येक कोनात एक बुरुज आहे. त्याच्या भिंतींच्या उंचीने तो वर येतो. किल्ल्यात अंतर्गत पंचकोन आहेत.

खालच्या किल्ल्याप्रमाणे प्रत्येक कोनात एक बुरुज आहे. तटबंदीला क्षेपणास्त्र सोडण्यासाठी तीन वेगवेगळ्या कोनातून असंख्य छिद्र केले आहेत. पावसाळ्यात एखादे ठिकाण वगळता किल्ला पुराच्या पाण्याने वेढला जातो. किल्ल्याजवळ बाला देवीचे मंदिर असून त्यावरून शहराचे नाव पडले. आज किल्ल्याचा बुरुज ढासळल्याने मोठी ऐतिहासिक हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!