अकोला दिव्य न्यूज : Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार आहेत, ते कधीही न थकणारे आणि कधीही न थांबणारे पंतप्रधान आहेत असं म्हणत भाजपा नेते राज पुरोहित यांनी त्यांचं कौतुक केलं. डोनाल्ड ट्रम्प हे मागील तीन महिन्यांपासून त्यांना फोन करत आहेत पण मोदी त्यांचा फोन उचलत नाहीत असंही राज पुरोहित यांनी सांगितलं. उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर खासदार म्हणून निवडलं गेल्याच्या निमित्ताने दादरमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज पुरोहित यांनी हे विधान केलं.

राज पुरोहित नेमकं काय म्हणाले?
नरेंद्र मोदींचे कौतुक करताना भाजपा नेते राज पुरोहित म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही न थकणारे, न थांबणारे पंतप्रधान आहेत. यामुळे माझा आत्मा म्हणतो की ते विष्णूचे अकरावे अवतार आहेत. आपण अमेरिकेला जाऊन आलो की दोन दिवस जेट लॉक लागतो. त्यानंतर आपल्याला विश्रांती घ्यावी लागते. पण मोदी फिनलंड, इंग्लंड दौरा करून अहमदाबादमध्ये दोन दिवसांत २२ उद्घाटनं करतात.या आधी अवधूत वाघ यांनीही मोदींना विष्णूचे अवतार म्हणत त्यांचं कौतुक केलं होतं तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मोदी हे विष्णूचा तेरावा अवतार आहेत म्हणत उपरोधाने त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान राज पुरोहित यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प तीन महिने मोदींना फोन करत आहेत पण…
एवढंच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींना गेल्या तीन महिन्यांपासून रोज फोनवर फोन करत आहेत. पण मोदी ट्रम्प यांचा फोन उचलत नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांची अवस्था वेड्यासारखी झाली. जो मोदींना नडेल तो मातीत मिसळेल असं वक्तव्यही राज पुरोहित यांनी केलं. यानंतर पुरोहित म्हणाले की, “आपण ज्यावेळी राष्ट्राचा विचार करतो त्यावेळी पंतप्रधान कसा असावा? याची प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते. आपल्या भारतीयांच्या मनातील पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे.इंग्लंडने आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केलं आज ते आपल्यासोबत मुक्त व्यापार करार करतात हे मोदींमुळे शक्य झालं असं राज पुरोहित म्हणाले.