Thursday, July 31, 2025
HomeUncategorizedमोठी बातमी ! राज ठाकरे मातोश्रीवर ; उध्दव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

मोठी बातमी ! राज ठाकरे मातोश्रीवर ; उध्दव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

अकोला दिव्य न्यूज : Raj and Uddhav Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यातच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यांवरून मुंबईत एकत्र येत मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आज रविवार २७ जुलैला सकाळी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास २० मिनिटांपेक्षा जास्त चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली?
दरम्यान, राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरे यांना आनंद झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरील भेट ही बाळासाहेबांच्या फोटोसमोर झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही बंधूंची गळाभेटही झाली. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झाल्याचं बोललं जात आहे.राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अगदी दोन शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “आज मला खूप आनंद झाला आहे.” दरम्यान, या भेटीवेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह आदी नेतेही उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना दिले होते युतीचे संकेत
मुंबईतील मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राजने सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय असा केला. त्याचंही कर्तृत्व सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशीच करत आहे. राजने मराठीचा मुद्दा व हिंदीच्या सक्तीबाबत अप्रतिम मांडणी केली. त्यामुळे मला भाषणाची आवश्यकता वाटत नाही. मला वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाठ अण्णाजीपंतांनी दूर केला आहे. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!