अकोला दिव्य न्यूज : Donald Trump : भारत-पाकिस्तान यांच्यात सीजफायर केल्याची सर्वात अगोदर घोषणा करून वारंवार याचा उल्लेख करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अनपेक्षितपणे भारतावर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. यासोबतच दंड लावण्याचेही जाहीर केले आहे. भारतासाठी हा मोठा धक्का समजला जातो आहे. आज बुधवारी त्यांनी ट्रुथ या सोशल प्लॅटफॉर्मवर याची घोषणा केली. अमेरिका १ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर अतिरिक्त २५ टक्के कर लादेल”, असं ते म्हणाले. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड लावण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे.

मित्र असूनही, भारत आणि अमेरिकेत फारसा व्यापार झाला नाही. “लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र आहे, परंतु गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यापार केला आहे. कारण ते खूप जास्त शुल्क लादतात. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्वात कठीण व्यापार अडथळे आहेत, असंही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रशियासोबतचा व्यापार भारतासाठी महागात पडला
गेल्या ३ वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, यामुळे युरोपीय देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले. युरोपीय देश रशियाकडून कच्चे तेल आणि वायू आयात करत नाहीत. यामुळे, भारत गेल्या अनेक वर्षांपासून रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करत आहे, हे अमेरिका आणि युरोपच्या डोळ्यात खुपत आहे. यामुळे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारतावर २५ टक्के शुल्क आणि दंड लादला आहे.