अकोला दिव्य न्यूज : तीन कथित गोरक्षकांनी गायचोरीच्या संशयावरून एका दलित युवकास मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच खामगाव तालुक्यात पुन्हा अत्याचाराची एक घटना घडली आहे. उसनवारीच्या क्षुल्लक कारणावरून एका दलित युवकास तिघांनी बेदम अमानुष मारहाण केली आहे. यामुळे खामगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्हा हादरला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील गणेशपूर (तालुका खामगाव) येथे ही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा तीन आरोपी युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ आणि ऍक्ट्रोसिटी कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहे. तिघांनी लाकडी दांडा, दगड व लाता बुक्क्यानी मारहाण केलेल्या युवकास खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.अजय संजय सोनटक्के ( वय २४ वर्षे) असे जखमी युवकाचे नाव आहे.
अजय खामगाव तालुक्यातील पाळा खडकी येथील रहिवासी आहे. त्याच्या मालकीचा ट्रॅक्टर असून त्याने शेतकऱ्यांच्या शेतातील नांगरनीचे काम करतो. मागील एप्रिल २०२५ मध्ये त्याने शिराळा ( तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा) येथील रहिवासी व मुख्य आरोपी शालिग्राम करांडे याच्या शेतातील नांगरणीचे काम अजय याने केले होते. याचा मोबदला ५ हजार रूपये न मिळाल्याने त्याने शालिग्राम याला फोन करून पैशाची मागणी केली. यावर शालिग्राम याने त्याला शिवीगाळ करून पैसे देत नाही, काय करायचे ते करून घे अशी तंबी दिली.
दरम्यान अजय गणेशपूर ( तालुका खामगाव) येथे पीक फवारणी औषध खरेदी करण्यासाठी गेला होता.यावेळी तिथे आलेल्या शालिग्राम करांडे याने अजय सोनटक्के याला दगड लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच दादाराव रमेश हटकर आणि कैलास करांडे ( दोन्ही राहणार शिराळा, तालुका खामगाव) यांना तिथे बोलवून घेतले. यानंतर तिघांनी अजयला मारहाण करून जातीयवाचक शिवीगाळ केली. यामुळे तो रक्त बंबाळ झाला. दरम्यान अजयचा काका गणेश सोनटक्के याने कसेबसे पुतण्यास तिघाच्या तावडीतून सोडविले.
गंभीर जखमी अजय सोनटक्के यास खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. डोक्याला जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. घटने संदर्भात हिवरखेड पोलिसांनी भारतीय ब न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहे.

दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस उग्ररूप घेताना दिसत आहे. त्यामुळे बुलढाण्याचा बीड जिल्हा बनत चाललाय की काय..? असा सवाल सामान्यांच्या मनात उभा राहतआहे. गेल्याच आठवड्यात खामगाव येथील एका दलित तरुणाला तिघांनी गाय चोरीच्या संशयावरून नग्न करून मारहाण केली होती. अजूनही जिल्ह्यात हा मुद्दा तापतच आहे. त्यातच काल पुन्हा एकदा खामगाव तालुक्यात दलित तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली आहे.