अकोला दिव्य न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारांच्या वाढत्या संख्येवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी होऊ लागल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत, जिथे बार बंद असावेत अशी अपेक्षा, तिथे अनधिकृत डान्सबार कसे सुरू राहतात, असा थेट सवाल त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. राज ठाकरे यांनी इशारा देऊन दहा तास उलटत नाही तेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असलेल्या लेडीज बरोबर हल्लाबोल सुरू केला. विकास होत असतानाही राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्यास संपूर्ण जिल्हाच बरबाद होतो. रायगड जिल्हा सध्या अशाच स्थितीकडे वाटचाल करत आहे, असे गंभीर निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
या भाषणाचा परिणाम काही तासांतच दिसून आला. शनिवारी मध्यरात्री १२ वाजता, मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील कोन गावातील नाईट रायडर हा लेडीज सर्व्हीस बारवर धडक दिली, हातामध्ये काट्या व दांडके घेऊन मनसेच्या संतापलेल्या सैनिकांनी हा बार फोडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या अगदी काही अंतरावर हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे या कारवाईमुळे उघडकीस आले. ही कारवाई केवळ अनधिकृत बारवर रोष व्यक्त करणारी नव्हे, तर बार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असल्याचा धक्कादायक प्रकारही यातून स्पष्ट झाला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दुहेरी पिळवणुकीचा मुद्दाही अधोरेखित केला होता. एकीकडे शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेणारे अमराठी बार मालक आणि दुसरीकडे त्याच जमिनीवर पिळवणूक करणारी व्यवस्था या कचाट्यात रायगडचा शेतकरी भरडला जात आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी उचललेले पाऊल केवळ स्थानिक संतापाचे प्रतिबिंब नसून, ठाकरे यांच्या इशाऱ्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवलेले ठोस पाऊल म्हणून पाहिले जात आहे. रायगड जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारसाठी ही घटना एक मोठा सवाल उभा करत आहे. अनधिकृत बार आणि अमर्याद दौलत जादा करण्याच्या या व्यवसायाला कोण जबाबदार आहे.असा प्रश्न उपस्थित होत आहे.