अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरात ‘अकोला महोत्सव २०२५’ हा महोत्सव केवळ एक सांस्कृतिक सोहळा न राहता पर्यावरण संरक्षण, सामाजिक जाणीव आणि युवकांसाठी रोजगार संधी यांचे त्रिसूत्री साधणारा एक ऐतिहासिक, मार्गदर्शक उपक्रम ठरणार आहे. मुख्य आकर्षण म्हणजे १० टन शुद्ध शाडू माती कोकणातील पेन येथून अकोल्यात आणली गेली असून ५० हून अधिक शाळांमधील तब्बल १० हजार विद्यार्थ्यांसोबत १६ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तापडिया नगर येथे होणाऱ्या कार्यशाळेत या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कार्यशाळा जगातील सर्वात मोठी शाळकरी शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा ठरण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती आयोजकांनी एका वार्ताहर बैठकीत दिली.

निलेश देव मित्र मंडळ आणि अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा परिषद, महानगरपालिका व राज्य शासनाच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांच्या मूर्ती सोबतच या कार्यशाळेतील उत्कृष्ट मूर्तींची निवड करून, त्या ‘नंद गणपती संग्रहालय, चिखलदरा’ येथे जतन केल्या जाणार आहेत. असं यावेळी सांगितले.
पर्यावरणविषयक प्रबोधन आणि मार्गदर्शन
POP मूर्तींमुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता, या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी शाळांमध्ये प्रबोधन मोहीम राबवली जात आहे.
कार्यशाळेत शरद कोकाटे, निशिकांत बडगे,दिनेश पारेख,कल्पना राव,प्रतिभा मानधने, अखिलेश पारीख, सौ. अमृता कुशल सेनाड आणि बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय प्राचार्य गजानन बोबडे मार्गदर्शन करणार आहेत. विशेष आकर्षण: १० वर्षांची बाल पर्यावरण कार्यकर्ती पूर्वा बगळेकर हीदेखील उपस्थित राहणार आहे. या कार्यशाळेसाठी तीन गट तयार केले असून गट १ हा इयत्ता ५ वी ते ७ वी, गट २: इयत्ता ८ वी ते १० वी आणि गट ३ हा वरिष्ठांचा गट असून प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार ३ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक २ हजार रुपये रोख आहे.
सुरक्षा आणि सोयीसुविधांचा संपूर्ण विचार
प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेमार्फत मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य मोफत दिले जाणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर वॉटरप्रूफ डोम, वैद्यकीय व्यवस्था व सुरक्षा यंत्रणा यांची पूर्तता केली गेली आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी युवकांना स्वप्नील करिअरकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी ५० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग असलेला रोजगार मेळावा अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केला आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील भरतीसाठी ऑन-द-स्पॉट मुलाखती, तात्काळ निवड प्रक्रिया,करिअर मार्गदर्शन सत्र होणार असून सोमेश्वर मोटे हे समन्वयक आहेत. अकोला इंड्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल आणि सचिव नरेश बियाणी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच १७ ऑगस्टच्या संध्याकाळी प्रसिद्ध वक्त्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे “भारतीय संस्कृती व संस्कृत भाषेचे आधुनिक जीवनातील स्थान” या विषयावर स्फूर्तीदायक व्याख्यान होईल.
या संपूर्ण उपक्रमामागे प्रदीप नंद आणि डॉ. माधवराव देशमुख यांचे पाठबळ लाभले अशी माहिती देताना निलेश देव मित्र मंडळाचे’ प्रमुख निलेश देव म्हणाले की अकोल्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय जाणीवेच्या केंद्रस्थानी असलेला हा महोत्सव भविष्यातील परिवर्तन घडवेल, याबद्दल आम्हाला विश्वास आहे.
सर्व शाळा, महाविद्यालये, संस्था व सामाजिक संघटनांनी या ऐतिहासिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छुकांनी ९८६०१२२५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पत्रकार परिषदेत जयंतराव सरदेशपांडे, निलेश देव, डॉ. माधवराव देशमुख, मनोज खंडेलवाल, देवराव विनायक दिगंबर स्मारक प्रतिष्ठान तर्फे शार्दूल अनंत दिगंबर ,सोमेश्वर मोटे, सौ. पल्लवी कुलकर्णी, विनोद देव, अतुल पाटील, गणेश मैराळ, रश्मी देव, डॉ. स्नेहा गोखले, शामराव कुलकर्णी, प्रकाश जोशी, कुशल सेनाड, अजय शास्त्री, आशिष गोरे, रामहरी डांगे, राजेंद्र गुन्नलवार राम उमरेकर, निलेश दूधलम, नरेंद्र परदेशी, शैलेश देव, सुनिल देशपांडे,विजय वाघ आशिष तिवारी,राजु कनोजिया, निलेश पवार, भास्करराव बैतवार शशीकांत हिवरखेडकर आदी सह निलेश देव मित्र मंडळ कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.