अकोला दिव्य न्यूज : गुंतवणूकीवर मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेऊन शहरातील एका होलसेल औषधी विक्रेत्याने कोट्यावधी रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मेडिकल प्रतिनिधीसह अनेकांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने बाजारपेठेत खळबळ माजली आहे.

अकोला शहरातील ‘द अशोक फार्मा’ या नावाने होलसेल औषध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मालक हिमेश महेश शाह, भावीन महेश शाह आणि हेतल हिमेश शाह यांच्या विरुद्ध मेडिकल प्रतिनिधी आतिश प्रमोद बिडवे (वय ४३) यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार बिडवे हे मेडिकल प्रतिनिधी असल्याने दवा बाजारात त्यांचे नेहमी जाणे-येणे असायचे. या दरम्यान इतर व्यावसायिकांच्या ओळखीतून त्यांची द अशोक फार्माचे मालक हिमेश महेश शाह, भावीन महेश शाह आणि हेतल हिमेश शाह यांच्याशी ओळख झाली.
यामुळे शाह यांच्या दुकानात जाणे येणे होते. दरम्यान शाह याने बिडवे यांना गुंतवणुकीवर मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. बिडवे यांनी त्यांच्या सासूकडून घेतलेली पंधरा लाखांची रक्कम आरोपींकडे गुंतवली. यासोबतच त्यांच्या मित्रांनीही शाह यांच्याकडे गुंतवणूक केली. सुरुवातीला बिडवे आणि त्यांच्या मित्राला शाह यांनी काही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून दिली त्यानंतर मात्र त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा वारंवार पैशांची मागणी केली, तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
आरोपींपैकी एकाने त्याच्या आई-वडिलांचा अहमदाबादमध्ये विमान अपघातात मृत्यू झाल्याचे कारण सांगून पैसे देण्यास नकार दिला. या प्रकरणी बिडवे यांनी ३१ जुलै २०२५ रोजी आरोपींना जवाहर नगरमधील एका मंगल कार्यालयाजवळ भेटण्यास बोलावले. त्यावेळी आरोपींनी बिडवे यांना धमकावले की, ‘माझे गुंडांसोबत संबंध आहेत, खोटा आरोप करून तुम्हाला अटक करू शकतो. त्यांनी बिडवे यांचा चेक घेऊन जाण्यास सांगितले आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर आरोपींनी त्यांचे घर आणि फ्लॅट विकून मुलांच्या शाळांचे टी.सी. काढून अकोला सोडून पलायन केल्याचे बिडवे यांच्या निदर्शनास आले. याशिवाय, गजानन गिरी, अनिल मेहता आणि विशाल गजभिये यांच्यासह इतर अनेकांचीही आरोपींनी अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले आहे.आता शाह परिवार कोणाचे फोन उचलत नसून ते अकोल्यातून निघुन गेले आहेत. तर देश सोडून जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांना वेळीच थांबविणे आवश्यक झाले आहे.
या संदर्भात, हिमेश महेश शाह, भावीन महेश शाह आणि हेतल हिमेश शाह यांच्या विरोधात भादंवि कलम ३१९(२), ३१८(४), ३५१(२), (३), (५) आणि (६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.