अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्याच्या पातूर शहरातील शिवभक्तांवर मध्य प्रदेशमध्ये काळाने घाला घातला. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून पवित्र गंगाजल घेऊन परतणाऱ्या कावड यात्रेमध्ये वाळूच्या अनियंत्रित ट्रकची धडक लागल्याने कावड यात्रेतील ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. त्याखाली दबून दोन शिवभक्तांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील सिवनी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली.बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश पोहरे अशी मृतांची नावे आहेत.

अकोला जिल्ह्यातील पातूर येथील जय तपे हनुमान व्यायाम शाळेच्यावतीने कावड यात्रा काढण्यात आली होती. काशी विश्वनाथ येथून गंगाजल घेऊन ही कावड यात्रा परतीच्या मार्गावर असताना एक दुर्दैवी घटना घडली. मध्य प्रदेशमधील सिवनी येथे कावडधारी शिवभक्तांनी रात्रीचे जेवण घेतले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून ते महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते.

यावेळी मागून येणाऱ्या वाळूचा अनियंत्रित ट्रक कावड यात्रेमध्ये शिरला. या ट्रकने कावड यात्रेतील ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ट्रॅक्टर व ट्रॉली अनियंत्रित होऊन कावडधाऱ्यांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे त्याखाली दबून दोन कावडधारी शिवभक्तांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले आहेत. बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश पोहरे अशी मृतांची नावे आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारार्थ तत्काळ स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जखमींपैकी देखील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. मध्य प्रदेश पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे.

खासदार, आमदारांचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क. कावड अपघात प्रकरणाची माहिती मिळताच भाजप प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यादव यांच्याशी थेट संपर्क साधून अपघाताची सविस्तर माहिती घेतली. अपघातग्रस्तांना आर्थिक मदत सोबत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
