“
अकोला दिव्य न्यूज : Donald Trump and Vladimir Putin Meeting : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून संघर्ष सुरू आहे. रशिया सातत्याने युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ले करत आहे, तर युक्रेनही रशियाला जशास तसं प्रत्युत्तर देत आहे. या युद्धाचे परिणाम जगभरात पाहायला मिळत आहेत. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद देखील साधला होता. त्यानंतर अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावावर पुतिन यांनी सहमती दर्शवली होती. मात्र, काही अटी ठेवल्या होत्या. आता डोनाल्ड ट्रम्प हे स्वत: व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भातील माहिती ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची बहुप्रतिक्षित बैठक शुक्रवारी १५ ऑगस्ट २०२५ अलास्काच्या ग्रेट स्टेटमध्ये होईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पुतिन आणि ट्रम्प यांच्यात कोणत्या विषयांवर चर्चा होणार?दरम्यान, पुतिन आणि ट्रम्प यांच्या या भेटीत रशिया-युक्रेन युद्धबंदीसाठी तोडगा काढण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. पुतिन आणि ट्रम्प यां ही भेट अलास्कामध्ये होणार आहे. पुतिन यांचा अलास्काचा हा दौरा गेल्या दशकातला त्यांचा पहिलाच अमेरिकेचा दौरा असेल. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं की, ते युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याची योजना आखत आहेत.

अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावावर पुतिन यांनी काय अट ठेवली होती
पुतिन यांनी युक्रेनबरोबर सुरू असलेले युद्ध थांबवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी सहमत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांनी एक अट ठेवली होती. व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं होतं की, रशिया लढाई थांबवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी सहमत आहोत. पण कोणत्याही युद्धबंदीमुळे कायमस्वरूपी शांतता निर्माण झाली पाहिजे आणि संघर्षाची मूळ कारणे दूर झाली पाहिजेत.

शत्रुत्व थांबवण्यासाठी युद्धबंदीच्या प्रस्तावाशी आम्ही सहमत आहोत. पण युद्धबंदीमुळे शांतता निर्माण झाली पाहिजे. तसेच या संकटाची मूळ कारणे दूर झाली पाहिजेत, या वस्तुस्थितीवरून आम्ही पुढे जात आहोत,असं पुतिन यांनी याआधी झालेल्या एका बैठकीत म्हटले होते.
