अकोला दिव्य न्यूज : नोकरीची मुळीच चिंता करायची नाही. थेट मंत्रिमहोदय अन् मंत्रालयापर्यंत आपली लाइन आहे. पैसे भरा अन् डायरेक्ट ऑर्डर घ्या. भरती, परीक्षा, मेरिट आम्ही सांभाळून घेऊ,’ अशा शब्दांत एजंटांनी अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील तरुणासह बीड, धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार या ७ जिल्ह्यांतील जवळपास २६ तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून व बनावट ऑर्डर देऊन तब्बल ४ कोटींचा गंडा घातला. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आला आहे.

मुंबई, पुणे येथील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मीटिंग घेत केंद्र व राज्य शासनातील सनदी अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेली नियुक्तिपत्रे एजंटांनी दिली आहेत. या नियुक्तिपत्रांवर शासकीय राजमुद्रासोबत दिल्ली व इतर महानगरांचा उल्लेख आहे. ट्रेनिंग सेंटरवर गेल्यावर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. तिलकचंद पाटील नामक एजंटने कस्टम, इन्कम टॅक्स, नौदल, शिक्षण विभाग, महसूल व इतर विभागांत नोकरीचे आमिष दाखवत तरुणांना मुंबई व पुण्यात बोलावले.
पुण्याचा किरण पथारे, अकोल्याचा नीलेश राठोडशी परिचय झाला. त्यांनी तरुणांना आलिशान हॉटेलमध्ये थांबवले. आपले नेटवर्क सर्व विभागात आहे. हे यांच्या मनात रुजवलं आणि पदानुसार १२ ते २५ लाखांपर्यंत मागणी केली. काहींनी रोखीने तर काहींनी धनादेश, आरटीजीएस, ऑनलाइनने त्यांना पैसे दिले. वारंवार होणाऱ्या अशा बैठकांमध्ये काही तरुण-तरुणींचे फोटो दाखवून यांना आम्हीच नोकरीस लावले असे सांगितले.
शासकीय राजमुद्रा, त्यावर बनावट शिक्के,सनदी अधिकाऱ्यांच्या नावासह स्वाक्षरी असलेली सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, दिल्ली व नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सेस, हरियाणाच्या नावे तरुणांना नियुक्तिपत्रे दिली. ट्रेनिंगचे ठिकाण अन् वेळ दिली, तर इतरांना पोलिस व्हेरिफिकेशन, मेडिकल सर्टिफिकेटची कागदपत्रे दिली.
ट्रेनिंगसाठी दिलेले बोगस पत्र : नोकरीसाठी निवड झाली आहे. आता ट्रेनिंग देण्यात यावे, असे बनावट पत्र तरुणांना देण्यात आले आहे. या कागदपत्रांवर विश्वास ठेवून काही तरुण प्रत्यक्ष ट्रेनिंग सेंटरवर अन् नियुक्तीच्या ठिकाणी गेल्यावर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

नोकरीसाठी पैसे भरलेल्या युवकाला ठगांनी चक्क सीबीआयमध्ये नियुक्ती झाली असल्याची बनावट ऑर्डर दिली. त्यावर जावक क्रमांक, अधिकाऱ्यांच्ऱ्या स्वाक्षऱ्या, त्या विभागाचा लोगो आणि शिक्केदेखील बनावट आहेत.
बहिणीचे दागिने विकून नोकरीसाठी १२ लाख भरले : भूषण (नाव बदलले आहे) याने नुकतेच लग्न झालेल्या बहिणीचे दागिने मोडून १२ लाख भरले. नोकरीनंतर दागिने करून देण्याची हमी दिली होती. मात्र नोकरी लागली नाही. फसवणूक झाल्याने दागिने करून देता आले नाही. नैराश्य आल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तो बचावला.
दलालाने १० लाखांचे चेक दिले, वटलेच नाही
एजंट राठोड याने प्रत्येकी १० लाखांचे दोन चेक फसवणूक झालेल्या तरुणाला दिले. मात्र ते चेक वटलेच नाहीत. मे महिन्यापासून तिघांचे मोबाइल बंद आहेत. शिवाय त्यांचे कुटुंबीय तक्रारदारांना दाद देत नाहीत.
फसवणूक झालेल्या राज्यभरातील तरुणांनी पुढे यावे. तक्रार द्याव्यात. असाच प्रकार ठाणे येथेही झाला आहे. याबाबत पोलिस चौकशी करून योग्य ती कारवाई करतील. अशी माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक धीवरे सुरूवातीला अकोला येथे होते