रंगमंच ही कलावंतांची उदय भूमी – प्रदीप खाडे
अकोला दिव्य न्यूज : सिने किंवा नाट्यकलावंत हे समाजातील समस्यांना वाचा फोडणारे चेहरे असतात. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला वेगवेगळे संदेश देण्याचे कार्य प्रामाणिकपणे करीत असतात. अशा कलावंतांचा उदय हा शालेय, महाविद्यालयीन अथवा सामाजिक रंगमंचावरून होत असतो. त्यामुळे या रंगमंचला अधिक मजबूत व सुदृढ करण्याचा प्रयत्न नवकलावंतांनी केला पाहिजे. असे प्रतिपादन अ. भा. लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘स्वातंत्र्य करंडक’ एकांकिका नाट्य स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रारंभी दीप प्रज्वलन व रंगमंच देवता नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. नाट्य परीक्षणला उपस्थित असलेले सिने व टीव्ही स्टार अपूर्वा चौधरी निपुंगे आणि चैतन्य सरदेशपांडे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजक सिद्धी गणेश प्रोडक्शनचे संचालक सचिन गिरी यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. सदर स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील 20 एकांकिका नाटके सहभागी झाली आहेत. स्पर्धेचा शुभारंभ अकोला येथील राजेश्वर कॉन्व्हेंट च्या ‘सॉरी’ या नाटकाने करण्यात आला.

पहिल्या दिवशी ही तर फक्त तालीमच, रानभूल, मरसिया, नवस, जरभा, भानगड, व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या एकांकिका सादर करण्यात आल्यात.
कार्यक्रमास नाट्य परीक्षण मंडळाचे सदस्य अनिल कुलकर्णी, नाट्य दिग्दर्शक विष्णुपंत निंबाळकर, महेश इंगळे, अक्षय पिंपळकर, मंदार घेवारे, प्राचार्या सरिता वरणकर, माजी प्राचार्य राजेंद्र बोळे, मुख्याध्यापिका कांचन पटोकार, रघुनाथ गाडगे, अर्चना नवलखे, रूपाली कुलकर्णी यांचासह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन आयोजक सचिन गिरी यांनी केले.
दोन्ही परीक्षक प्रख्यात टीव्ही व सिने कलाकार
या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या अपूर्वा चौधरी नाशिक व चैतन्य सरदेशपांडे मुंबई हे दोघेही प्रख्यात टीव्ही व सिने कलावंत आहेत.
यापैकी अपूर्वा चौधरी यांनी नाट्य क्षेत्रात एम.ए ची पदवी घेतलेली आहे. सध्या त्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या इंद्रायणी मालिकेत सुशीला आत्याची भूमिका करीत आहेत. झी फाईव्ह वरील ‘टू हंड्रेड हल्ला हो’, झी टीव्हीवरील ‘आशीर्वाद तुझा एकविरा देवी’काय घडलं त्या रात्री, स्टार प्रवाह वरील ‘दुहेरी सिक्वेन्स’ कलर्स टीव्ही वरील बाळूमामा, इन्स्टिटयूट ऑफ पावटॉलॉजी आदी गाजलेल्या मालिकांमध्ये काम करीत आहेत.
त्याचप्रमाणे सिनेस्टार अक्षय खन्ना यांनी तयार केलेल्या ‘सेक्शन 375’ या हिंदी सिनेमात तसेच कलर्स वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘निमा डांगझॊप्पा’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका करीत आहेत.
चैतन्य सरदेशपांडे हे अभिनय व कथालेखन क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांनी टीव्ही मालिका ‘ठरलय तर मग’ यात महत्त्वाची भूमिका केली असून सध्या ते ‘चाणक्य’ या व्यावसायिक नाटकात महत्त्वाची भूमिका करीत आहेत.