शाडू मातीतून गणेशमूर्ती ! निलेश देव मित्र मंडळाचे आयोजन
अकोला दिव्य न्यूज : वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ’।। गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!! च्या जयघोषात अकोल्यात भक्तीभाव आणि पर्यावरणाचे संवर्धन एकत्र गुंफले गेले. निलेश देव मित्र मंडळाच्या उपक्रमात तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांनी वीस हजार हातांनी शाडू मातीपासून श्रीगणेशाच्या मूर्ती घडवत विघ्नहर्त्याला भक्तीची आणि निसर्गाला संरक्षणाची अर्पणवेल अर्पिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेश पूजनाने झाले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अकोला अर्बन बँकेंचे अध्यक्ष शंतनु जोशी, शिक्षणाधिकारी पवार, अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के, शरद कोकाटे आणि टिम, ढोणे महाविद्यालयाचा नागापुरे मॅडम व चमु, मनपा उपायुक्त विजय पारतवार, झोन अधिकारी राजेश सरफ, गजानन नारे, अशोक ढोरे, प्रमोद देंडवे, प्रमुख आयोजक निलेश देव व जयंत सरदेशपांडे, स्नेहा गोखले, अजय शास्त्री, कुशल सेनाड, अमृता सेनाड, पल्लवी कुळकर्णी यांची उपस्थिती होती. गणेशमूर्ती साकारण्यासाठी शरद कोकाटे यांनी केलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांकडून घडविलेल्या गणेशमूर्ती निश्चितच समाजाला नवी दिशा देणाऱ्या ठरल्या.

एकदंत, विघ्नहर्ता, सिद्धिविनायक, गजानन या नावांचे स्मरण करत विद्यार्थ्यांनी मूर्तीरचना केली. शाडू मातीपासून घडवलेल्या मूर्ती म्हणजे भक्ती आणि प्रकृतीचे पावन मिलन आहे. निसर्गाला इजा न होता बाप्पाचे स्वागत करण्याचा संकल्प या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्याने दृढ केला. या उपक्रमाने अकोल्यातून ‘गणराया माझ्या घरी ये, पण प्रदूषणाचा भार मातृभूमीवर करू नको’ असा संदेश दुमदुमला. या अनोख्या उपक्रमाने आगामी गणेशोत्सवासाठी अकोल्यातून एक आध्यात्मिक, भक्तीपूर्ण आणि पर्यावरणपूरक संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश देव तर सूत्रसंचालन रश्मी देव यांनी केले. उद्या रविवार १७ ऑगस्टला सकाळी रोजगार मेळावा व संध्याकाळी मंजुषा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन जठारपेठ स्थित छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार आहे.

‘व्यक्त होण्याचा श्रीगणेशा झाला’ – प्रकाश आंबेडकर
हा विश्वविक्रमी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना एकत्र आणणे हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमधील कला बाहेर आणण्याचे मोठे काम निलेश देव मित्र मंडळाने केले आहे. सर्वात चांगले या उपक्रमातून काय झाले, याची सुंदर शब्दांत मांडणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थी थोडा ‘मी व्यक्त होऊ की नको होऊ, काय करू की नको करू’ या शंकेत असतो. ‘मी केलेले योग्य आहे की ते स्वीकारले जाईल की नाही’ अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात असते. ती शंका सामूहिक पद्धतीने दूर केली गेली. आपल्या मनातील भीती कायमची निघाली आणि एका नव्या ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने विद्यार्थी कलेच्या माध्यमातून व्यक्त झाले. सृजनशक्ती आणि तिची ऊर्जा जीवनात उपयोगी पडत असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले, तर कलेच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा श्रीगणेशा आज झाल्याचे ते म्हणाले.
‘पर्यावरण बचावाचा कृतीत्मक कार्यक्रम’ – डॉ. सुनील लहाने
शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मितीने अकोल्याच्या नावाने विश्वविक्रमी नोंद होत आहे. शाडू मातीची कार्यशाळा ही पर्यावरणपूरक आहे. अकोलेकरांच्या हिताची आहे. ‘पीओपीपासून धोका आहे’ हे फक्त सांगितले गेले नाही, तर त्यावरचे उपाय आणि कृती करण्यासाठी पुढाकार घेत शाडू मातीच्या मूर्तीची निर्मिती केली गेली. आयोजक निलेश देव आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे कौतुक महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी यावेळी केले.
‘विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाचे बीजारोपण’ – अजित कुंभार
अकोला सांस्कृतिक पार्श्वभूमीची नगरी आहे. राजराजेश्वर नगरीत हा उपक्रम साजरा करत येणाऱ्या पिढीला खूप चांगला संदेश दिला गेला. ‘परंपरा आणि उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करावेत’ अशी प्रेरणा या उपक्रमातून दिली गेली. येणाऱ्या काळात हरित पृथ्वी, समतोल पृथ्वी असेल. विद्यार्थी हे भविष्य आहे. उद्याची पिढी आहे. पर्यावरणपूरकतेचा संदेश या उपक्रमातून दिला गेला. लोकमान्य टिळकांनी या उपक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यासाठी केली होती. भविष्यात दहा हजारांचा विद्यार्थी टप्पा 50 हजारांपर्यंत पोहोचवा असं म्हणत घरोघरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.