अकोला दिव्य न्यूज : डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय, विना देयकाने गर्भपात करण्याच्या गोळ्यांची अवैधरित्या विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीने दाखल केलेला अटकपुर्व जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला. अकोट येथील टावरी मेडिकोजमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठी विना गर्भपात गोळ्यांची विक्री होते असल्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरिक्षक मनिष गोतमारे यांनी वैद्यकीय अधिकारी विधि समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता व दोन पंच यासह बनावट ग्राहकास ५०० रुपयांच्या दोन नोटा देवुन गर्भपातच्या औषधासाठी टावरी मेडिकोज येथे पाठविले.

बनावट ग्राहकाने गर्भपाताच्या औषधाची मागणी केली असता टावरी मेडीकोजमधील एका कर्मचा-याने एक मोबाईल नंबर देऊन यावर गर्भपातच्या औषधाची मागणी करावी असे सुचविले. तेव्हा त्या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर एका व्यक्तीने एका कागदात बांधुन चार गोळ्या बनावट ग्राहकाला दिल्या. बनावट ग्राहकाने पाचशे रुपयाच्या दोन नोटा टावरी मेडीकोजमधील व्यक्तीस दिल्या. सदर व्यवहार पुर्ण होताच दबा धरुन बसलेल्या कर्मचा-याला इशारा दिला.तातडीने फिर्यादी औषध निरिक्षक आणि सोबतचे अधिकारी व पंच टावरी मेडीकोजमधे येऊन पंचासमक्ष पंचनामा व जबानी घेतली.
दुकानात हजर इसमाने स्वत:चे नाव पंकज टावरी व मालक बिपीन टावरी यांचा भाऊ असून त्यांच्या गैरहजेरीत दुकानात उपस्थित असल्याचे सांगितले. पंकज टावरीकडून बनावट ग्राहकाने दिलेल्या नोटा व पंचासमक्ष चार गोळया जप्त केल्या. सदर प्रकरणी बिपीन टावरी यांना गर्भपातच्या औषधाची खरेदी कुठुन केली याबाबत नोटीस देवुन विचारणा केली. टावरी यांनी नोटीसला उत्तर देखील दिले होते.
परंतु औषध निरीक्षक गोतमारे यांच्या लेखी फिर्यादीवरून सदर प्रकरणात एकापेक्षा अधिक व्यक्तीचा सहभाग असल्याचे नाकारता येत नाही. गर्भपातची औषधीची वीनाबील खरेदी, तोंडी मागणीने डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गोळ्याची विक्री करणे गंभीर बाब असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे. अशा लेखी तक्रारीवरुन दोन्ही आरोपी विरुध्द. १३ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिस स्टेशन अकोट शहराला गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे. गर्भपात औषधाचा पुरवठा कोणाकडून केला जातो आणि गोळ्या कोणाकडून खरेदी केल्या या गुन्ह्यांमध्ये आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे. याचा सखोल तपास करण्याकरीता आरोपीची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अकोट शहर पो.स्टे चे पो.नि. अमोल माळवे व पो.उप.नि अविनाश मोहिते करत असून तपास अजुन पुर्ण झाला नाही.जप्त केलेल्या गोळ्यां गर्भपातासाठीच्याच असल्याचे शासकीय तपासणी अहवालात नमूद केले आहे. तेव्हा या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी आरोपींची चौकशी करणे आवश्यक असल्याने आरोपीचा अटक पुर्व जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपीचा अटकपुर्व जमानत अर्ज नामंजूर केला.
या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जाला विरोध करतांना न्यायालयात लेखी उत्तर देऊन युक्तीवाद केला.