Saturday, August 30, 2025
HomeUncategorizedखळबळजनक दावा ! माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर म्हणाल्या खाकीने भगवे, हिरवे,...

खळबळजनक दावा ! माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर म्हणाल्या खाकीने भगवे, हिरवे, पांढरे होणे हे घातकच

अकोला दिव्य न्यूज : मालेगाव बॉम्बस्फोट, मुंबईतील ७/११ मधील साखळी बॉम्बस्फोट आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने मृत्युमूखी पडलेल्या निरपराध लोकांना न्याय देऊ शकलो नसल्याचा खळबळजनक दावा माजी आयपीएस अधिकारी मीरां चड्डा बोरवणकर यांनी केला. तसेच पोलिस दलासह सर्व सरकारी विभागांची निष्ठा ही संविधानावरच असली पाहिजे, खाकीने भगवे, हिरवे, पांढरे होणे हे घातक आहे. असा उल्लेख त्यांनी केलं आहे.

हे सांगताना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पुण्यात कशाप्रकारे हिंसाचार घडले याचे पुरावे असून गुन्हा दाखल केला, तर तुम्हाला मुंबई पोलीस आयुक्त करणार नाही असा राजकीय दबाव आणण्यात आला असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पुण्यातील साने गुरूजी स्मारक येथे डॉ. दाभोळकर ग्रंथमालेतील पाच पुस्तकांचे प्रकाशन समारंभ बुधवारी बोरवणकर, ‘भूरा’कार शरद बाविस्कर आणि शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी’ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी आंतरजातीय वधुवर सूचक केंद्राच्या ‘विवेकी विवाह’ या ऑनलाईन संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले.

बोरवणकर पुढे म्हणाल्या, ‘मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाबाबत दिल्लीतील राजकीय पुढाऱ्याचा दबाव असल्याचे तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांना सांगितले होते, तर राष्ट्रीय तपास यंत्रणेने दबाव आणल्याचे नामवंत सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी सांगितले होते. डॉ. दाभोळकरांच्या खून प्रकरणात दोघांना शिक्षा सुनावताना या कटामागच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाला अपयश आल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदविले.

इतक्या संवेदनशील प्रकरणात राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळेच पीडितांना न्याय मिळू शकलेला नाही. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश खून प्रकरणी अद्याप आरोपपत्र तयार करण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे या अकार्यक्षमतेला आणि प्रदीर्घ विलंबाला न्याय म्हणायचे का? असा प्रश्न बोरवणकर यांनी केला.श्

बाविस्कर यांनी श्रद्धा व ज्ञानातील द्वंद्वात्मक वाद उलगडला. ते म्हणाले, ज्ञानव्यवहारात बाधक धरणारी श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा असून, त्यामध्ये अर्थकारण व राजकारणाचे हितसंबंध दडलेले असतात. त्यासाठी समाजमन चिकित्सक बनले पाहिजे. परंतु, शैक्षणिक संस्था बुद्धिवादी, चिकित्सक शिक्षण देण्यात कमी पडत असून ही शैक्षणिक व्यवस्था कुचकामी आहे. चिकित्सा केली की धर्माच्या नावाने आरोप केले जाताता. समाजात आक्रोश, तळमळ याबद्दल समाजात उदासीनता दिसून येते. हा भाव संविधानाला अपेक्षित नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला जाणार म्हणून धमकीचा मेल
राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर वाइट परिणाम झाल्याची नाराजी व्यक्त करताना ‘या कार्यक्रमाला का जाता, म्हणून मला धमकीचा इमेल आला होता,’ असा आरोप केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!