अकोला दिव्य न्यूज : शहरातील मध्यवर्ती भागात पथविक्रेत्यांमुळे अतिक्रमणाची समस्या निर्माण होऊन, बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांना याचा हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा ही समस्या कायमची निकालात काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शासन निधीतून येथील पथविक्रेत्यांसाठी गरीबांचं वाणिज्य संकुल उभारण्यात येईल आणि यापुढे मध्यवर्ती भागात अतिक्रमण होऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार साजिद खान पठाण यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या मागच्या बाजूला वर्षे २००६ मध्ये उभारण्यात आलेल्या हॉकर्स झोनला आज आ.पठाण यांनी भेट देऊन पाहणी केली. मध्यवर्ती भागात विशेषतः गांधी रोड, मनपा परिसर आणि न्यु क्लॉथ मार्केट या परिसरात पथविक्रेते दुकाने थाटतात. यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा होतो. येथील व्यापाऱ्यांचा व्यवसायावर विपरीत परिणाम होतो. मनपा अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. पण परत अतिक्रमण होते. यामध्ये दोघांचे आर्थिक नुकसान तर होतेच आणि समस्या कायम राहते. यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तेव्हा मनपा प्रशासन आणि राज्य शासन यांच्यासोबत चर्चा करून गरिबांचे वाणिज्य संकुलासाठी तत्वतः मंजुरी दिली की, यानंतर रस्त्यावर अतिक्रमण होऊ देणार नाही अशी हमी देऊन प्रस्ताव सादर करू असे आ. पठाण यांनी यावेळी सांगितले.

पथविक्रेत्यांवर वारंवार मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून होणारी कारवाई, यामध्ये त्यांचे होणारे आर्थिक नुकसान आणि पुन्हा अतिक्रमण, यावर उपाय म्हणून लघु व्यवसाय व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक मेश्राम यांनी पुढाकार घेऊन २००६ मध्ये तत्कालीन आयुक्त रोकडे आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्यासोबत सतत चर्चा केली आणि अखेर खुले नाट्यगृह मागे हॉकर्स झोन निर्माण झाले. लघु व्यवसाय व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक मेश्राम यांच्या पाठपुराव्याला यश मिळून मोठ्या संख्येने पथविक्रेत्यांनी येथे व्यापार सुरू केला. दुर्दैवाने काही नगरसेवकांनी यात राजकारण केले आणि लघु व्यवसायामध्ये उभी फूट होऊन हॉकर्स झोन म्हणजे फेरीवाला बाजार बंद पडला.
आ.पठाण यांनाही सर्व माहिती असून सत्य परेशान होता है लेकीन पराजित नाही, असं मेश्राम म्हणाले. आता शहरातील ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी आ.पठाण यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी लघु व्यवसायीकांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने पथविक्रेता उपस्थित होते.