Saturday, August 30, 2025
HomeUncategorizedकुणी सुरू केला सार्वजनिक गणेशोत्सव ? भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक

कुणी सुरू केला सार्वजनिक गणेशोत्सव ? भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक

अकोला दिव्य न्यूज : विघ्नहर्ता गणरायाचे पुढील १० दिवसासाठी आज २७ ऑगस्ट २०२५ रोजी भुतलावर आगमन होतं आहे.‌ बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक भक्तासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही सज्ज झाली आहेत. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. तर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात झाली ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. पण ही सुरुवात कुणी केली, याबाबत एक वाद दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान होताना दिसत आहे.या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव नेमका कुणी सुरू केला याचाच घेतलेला हा आढावा.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही. पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती, असा भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा दावा आहे.

टिळकांनी 1894 साली विंचूरकर वाड्यातगणेशोत्सवाची सुरुवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्षं आधी म्हणजेच 1892 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती, असं रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सांगतात.

तर पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893 साली झाल्याचं मत इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिलं आहे. भाऊसाहेब रंगारी, विश्वनाथ खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी 1893 मध्ये एक लेख लिहून केसरीतून घेतली होती. त्याच्या दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवाची संख्या तीनहून वाढून 100च्या वर गेली होती.

भाऊ रंगारी कोण होते?
भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसायानं वैद्य होते. त्यांच्या दुमजली घरात धर्मार्थ दवाखाना होता. त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची ते मनोभावे सेवा करत असत. तसंच त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा अधिकार होता. त्यांचे आणि संत जंगली महाराज यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते असं जंगली महाराजांचे शिष्य सांगतात,” असं जावळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. “भाऊसाहेबांचा पंरपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता. त्यावरून त्यांना रंगारी हे उपनाव पडलं होतं.

भाऊ रंगारी हे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते. असुर रूपातील ब्रिटिशांच्या सत्तेचा गणपती नायनाट करत आहे, अशी संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी मंडळाची मूर्ती बनवली होती,असं जावळे सांगतात.

“महाराष्ट्र सरकरानं प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोशात भाऊ रंगारी यांच्या नावाचा समावेश आहे. या कोशात देखील रंगारी यांनी 1892 साली सार्वजनिक गणपती उत्सव सुरू करण्याचं कार्य केलं आहे अशी नोंद आहे,” अशी माहिती जावळे यांनी दिली.

कशी झाली गणेशोत्सवाला सुरुवात?
पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासावर मंदार लवाटे यांनी “पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव 121 वर्षांचा” हे पुस्तक लिहिलं आहे. मोडी पत्रांच्या आधारे आपण हे सांगू शकतो की महाराष्ट्रात घराघरात गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे. पुणे-औंध या भागातील लोक गणपती विसर्जनासाठी ओळीनं जात असत. या रांगेत सर्वांत पुढे त्या गावचा पाटील असे, लवाटे सांगतात.

बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी शनिवारवाड्यात मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पेशव्यांचे सरदार त्यांचं अनुकरण करू लागले होते. पुरंदरसारख्या किल्ल्यांवर देखील गणेशोत्सव साजरा केला जात असे.

इंग्रजांची सत्ता आल्यावर देखील 1819-20 साली दफ्तरखान्यात ब्रिटिशांच्या पैशांनी गणपती बसवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर पुण्यातल्या घराघरात गणपती बसत होते, श्रीमंत सरदारांकडे गणपती बसत होते, इतकंच काय तर देवदासींच्या घरीसुद्धा गणपती बसत असत.


1893 साली विश्वनाथ खासगीवाले ग्वाल्हेरला गेले. तिथं त्यांनी एका सरदाराच्या घरी थाटामाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर भाऊ रंगारी, घोटावडेकर आणि खासगीवाले यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली,” असं लवाटे सांगतात. खासगीवाले ग्वाल्हेरहून परत आल्यावरच पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात झाली या मताशी भाऊ रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सहमत आहेत. फक्त ते वर्ष 1893 नाही तर 1892 हे होतं असं त्यांचं म्हणणं आहे.

खासगीवाले 1892ला ग्वाल्हेरहून जाऊन आल्यावर तिघांनी मिळून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. रंगारी यांच्या घरी तत्कालीन प्रतिष्ठित मंडळींची एक बैठक झाली होती. त्या बैठकीला बळवंत सातव, गणपतराव घोटवडेकर, सांडोबाराव तरवडे, खासगीवाले, बाळासाहेब नातू, लखीशेठ दंताळे, आप्पासाहेब पटवर्धन आणि दगडूशेठ हलवाई हे लोक उपस्थित होते.

या सर्वांच्या पुढाकाराने 1892मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. खासगीवाले, घोटवडेकर आणि रंगारी यांनी तीन ठिकाणी गणपती बसवले. दहाव्या दिवशी त्यांचं विसर्जन देखील वाजत गाजत करण्यात आलं होतं, जावळे पुढे सांगतात.याबद्दल सविस्तर बोलायला लोकमान्य टिळकांचे वंशज दीपक टिळक यांनी नकार दिला. हा वाद उकरून काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

26 सप्टेंबर 1893 साली ‘केसरी’मध्ये टिळकांनी या गणेशोत्सवाची नोंद घेत पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांचं कौतुक केलं असल्याचं जावळे सांगतात. गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र येत असेल तर ती आनंदाची बाब आहे, असं टिळकांनी म्हटलं होतं. रंगारी यांनी आपल्याआधी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली, ही बाब टिळकांना मान्य होती हे यावरून स्पष्ट होतं,” असा दावा जावळे करतात. 1894 साली लोकमान्य टिळकांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच विंचूरकर वाड्यात गणपतीची स्थापना केली. 1894 साली पुण्यात शंभरावर सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली.

मग टिळकांनी नेमकं काय केलं?
भाऊ रंगारींनी पहिल्यांदा गणपत्युत्सवाला सार्वजनिक रूप दिलं असलं तरी त्याला व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम टिळकांनी केलं, असं जाणकारांचं मत आहे.गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं, असं इतिहासकार बिपान चंद्रा यांचं मत आहे.

बिपान चंद्रा यांनी आपल्या ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ या पुस्तकात म्हटलं आहे, “1893 सालापासून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी केला. देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत असत. 1896मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला देखील सुरुवात केली. त्याच वर्षी टिळकांनी विदेशी कपड्यांवरील बहिष्काराची चळवळ देखील सुरू केली होती.”

1904-05 पर्यंत तर गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे, याची कल्पना देखील इंग्रजांना लागली नव्हती. इतर वेळी एखाद्या भाषणाचं आयोजन करायचं असेल तर इंग्रजांची परवानगी लागायची, पण गणेशोत्सवात ती लागत नसे,” असं लवाटे सांगतात. 1908 साली टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात सहा वर्षांची शिक्षा झाली. टिळक मंडालेला गेल्यानंतर देखील गणेशोत्सवाचं स्वरूप काही अंशी तसंच राहिलं,

जून 1914ला ते मंडालेहून परत आले. त्यावेळी गणेशोत्सवाचा फायदा टिळकांना होऊ नये म्हणून इंग्रजांनी पावलं उचलली होती, अशी नोंद डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकात आहे. टिळकांमुळेच गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाल्याचं मत डॉ. मोरे यांनी मांडलं आहे.

टिळक आणि भाऊ रंगारी
टिळकांचे आणि भाऊ रंगारी यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते. पहिल्यांदा जेव्हा रंगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची 1893 साली सुरुवात केली तेव्हा त्यांचा टिळकांनी ‘केसरी’मधून गौरव केला होता. टिळक हे रंगारी यांच्या गणपती ट्रस्टचे ट्रस्टी देखील होते, असं जावळे सांगतात. 2017 मध्ये पुणे महानगर पालिकेनं सार्वजनिक गणेश मंडळांची 125 वर्षं पूर्ण झाली म्हणून एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटलं.

सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना भाऊसाहेब रंगारी यांनी केली की लोकमान्य टिळकांनी केली हा प्रश्न ऐरणीवर आला होता. पुण्यात सर्वांत आधी भाऊ रंगारी यांनी 1892ला गणेशोत्सव सुरू केला होता असं म्हणत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टनं महापालिकेला नोटीस पाठवली. ऐतिहासिक घटनांना बगल देऊन लोकांच्या पैशांच्या अपव्यय करणं अयोग्य असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं होतं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!