अकोला दिव्य न्यूज : Kalkaji Temple News: कालका देवीच्या सेवेकऱ्याच्या हत्येने दिल्ली हादरली. दर्शनास आलेल्या भाविकांनीच हे राक्षसी कृत्य केले. सेवेकऱ्याने प्रसाद व देवीची चुनरी न दिल्यानं राग आला आणि त्यांनी थेट सेवेकऱ्याला दाडक्यांनी मरेपर्यंत मारलं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, कालकाजी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. कालकाजी मंदिर परिसरात वाद सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षात कॉल देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.
लाथा-बुक्क्या आणि काठ्या, आरोपी सेवेकऱ्यावर तुटून पडले काही प्रत्यक्षदर्शीने सांगितले की आरोपींनी दर्शन घेतले. पण त्यांना प्रसाद व देवीची चुनरी मिळाली नाही. तेव्हा त्यांनी सेवेकऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेला व आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर थेट काठ्या घेऊन आरोपी तुटून पडले.
https://twitter.com/i/status/1961642673355321689
यात ३५ वर्षीय सेवेकरी योगेंद्र सिंह गंभीर जखमी झाला. तो उत्तर प्रदेशातील हरदोईतील फत्तेपूर येथील रहिवाशी होता. रक्तबंबाळ अवस्थेत योगेंद्रला दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. योगेंद्र मागील १५ वर्षांपासून मंदिरात सेवेकरी म्हणून होता.
अटक करण्यात आलेला आरोपी कोण ? : कालकाजी पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले. तर एकाला मंदिरातील लोकांनी पकडले. त्याची ओळख पटली असून, अतुल पांडे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सध्या पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.