अकोला दिव्य न्यूज : संततधार व जोरदार होत असलेल्या पावसाने शहरालगतच्या रानावनातून वन्यजीव प्राणी रहिवासी वसाहतीत येत असून आज अकोला शहरालगतच्या खडकी परिसरात तब्बल 12 फुटाचा अजगर आढळून आल्याने याभागात मोठी खळबळ उडाली. मात्र वेळीच सर्पमित्र व ग्रामस्थांनी योग्य वेळी मदत केल्याने मोठा अनर्थ टळला.

खडकी रहिवासी वसाहतीजवळच असलेल्या शहापुरे यांच्या शेतात शेतीचे काम सुरू असताना अचानक तब्बल 12 फुटाचा अजगर आढळून आल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने स्थानिक अजगर आढळून अजित देशमुख यांना पाचारण केले. त्यांच्यासह प्रवीण हुंडीवाले, सतीश गवळी, प्रवीण गवळी, राजेश गवळी, अतुल लंगोटे व अन्य ग्रामस्थांनी धाडसाने शर्थीचे प्रयत्न करत अजगराला सुरक्षितपणे पकडले. यानंतर वन्यजीव संरक्षण नियमांचे पालन करत या अजगराला निसर्गाच्या सानिध्यात जंगलात सोडून देण्यात आले. योग्य वेळेत खबरदारी घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा इजा झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, सर्पमित्र व ग्रामस्थांनी योग्य वेळी मदत केली नसती, तर मोठा अनर्थ ओढवू शकला असता.यानंतर ग्रामस्थांनी संबंधित सर्पमित्रांचे आभार मानले.