Sunday, August 31, 2025
HomeUncategorizedWho is Jyeshtha Gauri ? ज्येष्ठागौरीचे गणपतीशी असलेले नाते नेमके काय !...

Who is Jyeshtha Gauri ? ज्येष्ठागौरीचे गणपतीशी असलेले नाते नेमके काय ! जाणून घेऊ परंपरा काय सांगते

अकोला दिव्य न्यूज : Who is Jyeshtha Gauri in Hindu Tradition? भारतीय मन हे उत्सवप्रिय आहे; अनेक सांस्कृतिक सण आपल्याकडे उत्साहात साजरे केले जातात. गणेश चतुर्थी हा याच परंपरेतील सगळ्यात मोठा सण. घरोघरी मोठ्या थाटात गणेशाचे आगमन होते. गणपती हे या सणाचे आराध्यदैवत असले तरी या काळात गणेशाच्या मागून लगेचच येणाऱ्या गौरींनाही तेवढेच महत्त्व आहे. त्याही त्याच थाटात गणेशाच्या शेजारी विराजमान होतात व आपले अस्तित्व गणेशाच्या बरोबरीने व्यक्त करतात.

भाद्रपदातील ज्येष्ठागौरी
भाद्रपद महिन्यात येणाऱ्या या गौरींचे व्रत हे ज्येष्ठागौरी या नावाने प्रसिद्ध आहे. गणेशाचे व गौरींचे हे एकत्र आगमन निश्चितच त्यांच्यातील ऋणानुबंध दर्शवते. महाराष्ट्रात राज्यात सर्वत्र गौरी-गणपतींचे आगमन होते. गणेशासोबत येणाऱ्या या गौरी कधी गणेशाची पत्नी म्हणून तर कधी भगिनी किंवा महत्त्वाचे म्हणजे माता म्हणून येतात. कधी त्या लक्ष्मी रूपात, तर कधी पार्वती स्वरूपात असतात. म्हणूनच या गौरी नक्की कोण, याचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते.

सृष्टीचा नवबहर म्हणजेच ज्येष्ठागौरी
मूलत: त्या आदिशक्तीच्या प्रतिरूपात असल्याने पार्वती व लक्ष्मी ही भिन्न नामाभिधाने असली तरी त्या आदिशक्तीच्या प्रतिरूपात असल्याने पार्वती व लक्ष्मी ही भिन्न नामाभिधाने असली तरी त्यांचा मूळ शक्तीस्रोत एकच आहे. म्हणूनच त्यांच्या उत्पत्तीचे मूळ आणि काळानुरूप त्यांच्या रूपात झालेला बदल व विकास हा तितकाच रोचक व गूढरम्य ठरतो.

गौर: म्हणजे सर्वोत्तम असे तेज, तपोबलाच्या तेजाने युक्त आहे ती म्हणजे गौरी. वैशाख वणवा सरला की, निसर्गात बदलाचे वारे वाहू लागतात, तप्त धरणीवर पर्जन्य तुषारांचे असंख्य मोती नवचैतन्य निर्माण करतात. सृष्टी जणू सासरच्या तप्त झळा सोसून माहेरी आलेल्या विवाहितेप्रमाणे पुन्हा एकदा बहरू लागते. गावोगावीच्या माता-भगिनी सृष्टीचे हे नवतेजाने बहरास येणे ज्येष्ठागौरी व्रताच्या माध्यमातून साजरे करतात. म्हणूनच कोकणासारख्या ठिकाणी पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक असलेल्या तेरड्याच्या रोपांचे गौरी म्हणून पूजन करण्यात येते. येथे साक्षात भू-मातेला गौरींच्या रूपात घरी आणून पोटच्या लेकीप्रमाणे यथामती, यथाशक्ती तिचे कोडकौतुक केले जाते. जगत् जननीच्या मातृत्वाचा सामान्य मातेकडून होणारा हा सन्मान अद्भुतच म्हणावा लागेल.

दोन भगिनी, सखी व त्यांची मुलेही…
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर या ज्येष्ठागौरींचे आगमन होते व त्यानंतर सलग तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात दोन दिवस आगमन व पूजा आणि तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे विसर्जन केले जाते. तीन दिवसांचा हा उपासना विधींचा क्रम सर्वमान्य असला तरी पूजनाच्या पद्धती व परंपरा या महाराष्ट्रातही निरनिराळ्या आहेत.

कोकणात एक तर देशावर दोन गौरींची म्हणजेच दोन भगिनींची आरास, असा प्रघात आहे तर काही ठिकाणी गौरींसोबत त्यांच्या सखी तर इतर काही ठिकाणी त्यांची मुलं यांचीही आरास करून पूजा केली जाते. ज्येष्ठा गौरींचे हे व्रत आज महाराष्ट्रात प्रचलित असले तरी उर्वरित भारतात कमी-अधिक फरकाने ज्येष्ठागौरींची उपासना केली जाते. प्रांतपरत्वे या उपासना विधींमध्ये भिन्नत्व आढळत असले तरी त्यांचा गाभा मात्र एकच आहे.

पूजा एकत्र, पण स्वभाव मात्र वेगळा
ज्येष्ठा गौरींचे मूळ नक्की कोणते याचा शोध घेतल्यास त्यांचा सर्वप्रथम स्पष्ट संदर्भ आपल्याला पुराणात ज्येष्ठा लक्ष्मी व कनिष्ठा लक्ष्मी असा सापडतो. वर नमूद केल्याप्रमाणे देशावर ज्येष्ठागौरींची आरास दोन बहिणींच्या रूपात केली जाते. याच दोघी पौराणिक ग्रंथात मोठी ‘ज्येष्ठा’, तर धाकटी ‘कनिष्ठा’ असल्याचे लक्षात येते. त्यांचा येणारा हा उल्लेख खूप नंतरच्या काळातला म्हणजे मध्ययुगीन असला तरी त्यांच्या गुण-कर्मानुसार त्यांचा प्राचीनतम् उल्लेख हा वैदिक वाङ्मयात ‘पापीलक्ष्मी’ व ‘पुण्यालक्ष्मी’ असा आलेला आहे.

या विशेषणांवरूनच दोघींच्या तामसिक व सात्त्विक प्रवृत्तीची अनुभूती होते. गौरी-गणपतीच्या काळात जरी दोघींची एकत्र पूजा होत असली तरी त्या परस्परविरुद्ध स्वभावाच्या आहेत, हे येथे वेगळे सांगायला नको.

लक्ष्मी व अलक्ष्मी
पौराणिक कथेनुसार एक ‘अलक्ष्मी’ (ज्येष्ठ लक्ष्मी) तर दुसरी ‘लक्ष्मी’ आहे. अलक्ष्मीचा उल्लेख ‘ज्येष्ठा’ असा येत असला तरी सुलक्षणी लक्ष्मीचा ‘कनिष्ठा’ असा उल्लेख धार्मिक वाङ्मयांनी टाळलेला आहे. अलक्ष्मीचे ‘ज्येष्ठा’ हे विशेषण तिच्या विघ्नरूपतेतून व त्यामुळे प्राप्त झालेल्या आद्यपूजेच्या मानातून लाभलेले आहे. महाभारत, पद्मपुराण आदी ग्रंथात लक्ष्मी व अलक्ष्मी यांच्या जन्माची समुद्रमंथनाची कथा देतात. समुद्रदेवतेच्या या कन्यांपैकी लक्ष्मीच्या जन्माशी अमृताचे तर अलक्ष्मीच्या जन्माशी हलाहलाचे साहचर्य पुराणकथांनी कल्पिले आहे.

हाच संदर्भ देऊन महाभारत लक्ष्मीला देवांची तर अलक्ष्मीला असुरांची असे नमूद करते. म्हणूनच दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणी व कचऱ्याच्या स्वरूपात अलक्ष्मीची पूजा करून नंतर लक्ष्मीला,अशुभ लक्ष्मी घरातून जाऊन शुभ लक्ष्मी घरात नांदो, अशी प्रार्थना केली जाते. पौराणिक संदर्भानुसार अलक्ष्मीचा वावर हा अनिष्ट, अशुभ ठिकाणी असतो, तर याउलट लक्ष्मी ही शुभ ठिकाणी विराजमान होते. मूलत: इष्ट व अनिष्ट ही एकाच लक्ष्मीची द्वंद्वात्मक रूपे आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्येष्ठेला दाखविण्यात येणारा मांसाहारी नैवेद्य हा निषिद्ध नाही.

तांत्रिकही तिचे पूजक
येथे लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे शक्तीचा उगम हा स्पंदनाच्या रूपात असतो. उत्पत्ती- स्थिती- लय हा शक्तीचा गुणधर्म आहे. ती सृष्टीतील सर्व सजीव-निर्जीव गोष्टींच्या रूपांतून प्रकट होते. तिला सकारात्मक तसेच नकारात्मक यापैकी कोणत्याही गोष्टी निषिद्ध नाहीत. ती एकाच वेळी सुर-असूर यांच्यामधून प्रकट होणारी आहे.

म्हणूनच वैदिकांप्रमाणे तिचे तांत्रिक ही पूजक आहेत व याच कारणास्तव अनेक ठिकाणी प्राचीन-धार्मिक वाङ्मयात अलक्ष्मीचे तसेच तिच्याशी साधर्म्य असणाऱ्या विघ्न मातृदेवतांची स्तुती करून आवाहन केल्याचे लक्षात येते. तर श्री सूक्तात अलक्ष्मीला घरातून बाहेर काढण्यासाठी लक्ष्मीलाच केलेली प्रार्थनाही आढळते. देवीच्या रूपातील हाच फरक दर्शविण्यासाठी पुराणकथाकारांनी विष्णूला लक्ष्मीचा स्वामी केले तर अलक्ष्मीला भर्तार परित्यक्ता म्हणून वर्णिले आहे.

ज्येष्ठेचे व गणेशाचे नाते
असाच ज्येष्ठेचे व गणेशाचे नाते सांगणारा आद्यसंदर्भ बौधायन गृह्यसूत्रात येतो. बौधायन गृह्यसूत्रातील ज्येष्ठा कल्पात ज्येष्ठा अलक्ष्मी उपासनेचा विधी सांगितला आहे. अगदी इसवी सनपूर्व पहिल्या शतकापासून ज्येष्ठ गौरी व विनायकरूपी गजाननाचे दृढ नाते होते, हे बौधायन गृह्यसूत्रातील पाठोपाठ येणाऱ्या ज्येष्ठा व विनायक कल्पावरून लक्षात येते.

ज्येष्ठाकल्पानुसार ज्येष्ठा म्हणजेच अलक्ष्मी ही रूपाने लंबोदरा, हस्तिमुखा आणि विघ्नपार्षदा आहे. तिच्या रथाला सिंह जोडलेले असून रथामागून वाघ चालत येतात. सिंह व वाघ ही प्रतीके तिचे नाते महादेवीशी सांगणारे आहे असे काही अभ्यासक मानतात. म्हणूनच काही ठिकाणी विशेषत: महाराष्ट्र, बंगाल तसेच दक्षिणेकडे ज्येष्ठागौरींचा संबंध पार्वतीशी जोडला जातो. तसेच बौधायन गृह्यसूत्रातील विनायक कल्पात विनायकांचा उल्लेख हस्तिमुखी व विघ्नपार्षद असा येतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!