अकोला दिव्य न्यूज : आज, रोबोटिक्स हे वेगाने वाढणारे क्षेत्र आहे, कारण तांत्रिक प्रगती सुरू असून नवीन रोबोटचे संशोधन, डिझाइन आणि बांधकाम विविध व्यावहारिक उद्देशांसाठी काम करत आहे. ही येणाऱ्या काळाची गरज बनली असल्याने पहिल्यांदा अकोला शहरात रोबोटिक्स तंत्र-अविष्कार प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रोबोटिक्स तंत्रज्ञान व प्रशिक्षणात अकोला शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे रोबोटिक्स तज्ज्ञ आणि केआयटीएस टेक लर्निग केंद्राच्या संचालिका काजल राजवैद्य यांच्या संकल्पनेतून केआयटीएस टेक लर्निंग केंद्र व रोटरी क्लब ऑफ अकोला इस्टच्या विद्यमाने नवे तांत्रिक व इलेक्ट्रॉनिक अविष्कार करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत तांत्रिक प्रकल्प स्पर्धा घेण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा व तरुणांच्या तांत्रिक व अभियांत्रिकी गुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
भविष्यात संशोधक व शास्त्रज्ञ होऊ इच्छिणाऱ्या या तंत्र स्पर्धेत सहभागी होता येईल म्हणून विविध श्रेणीत स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. या तांत्रिक स्पर्धेत रोबोटिक्स, एम्बेडेड सिस्टीम, इंटरनेट ऑफ थिंक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रिक व्हिकल, द्रोण टेक्नॉलॉजी, सोलार टेक्नॉलॉजी, सायबर सेक्युरिटी, ट्रोनिक्स आदी प्रकल्प राहणार आहेत.स्पर्धकांनी आपले प्रकल्प केआयटीएस लर्निंग सेंटर, पहिला माळा, मुक्ता प्लाझा, वैभव हॉटेलसमोर जुने इन्कम टॅक्स चौक, गोरक्षण रोड अकोला येथे पाठवावेत, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट व केआयटीएस लर्निंग केंद्रातर्फे केले आहे.
विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस
स्पर्धेत १० ते १५ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रथम पुरस्कार रोख ३ हजार रुपये आणि द्वितीय पुरस्कार रोख २ हजार रुपये आहे. वय १६ ते २२ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार असून द्वितीय ३ हजार रुपये व ट्रॉफी ठेवण्यात आले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग पत्र बहाल करण्यात येणार आहे. येत्या १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पातूर रस्त्यावरील प्रभात किड्स येथे अंतिम स्पर्धा होऊन विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येईल. अशी माहिती केआयटीएसतर्फे तंत्रज्ञान संचालक विजय घनश्याम भट्टड यांनी दिली आहे.