अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील नाट्य कलावंत आणि ज्येष्ठ समाजसेवक व अकोला जनता बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्रीकृष्ण पांडुरंग कवडे यांचे रविवारी निधन झाले.अकोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व. पांडुरंग कवडे यांचे चिरंजीव आणि शहर काँग्रेस कमिटीचे नेते आकाश कवडे यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले निलेश व आकाश कवडे, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. अतिशय हसतमुख व मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वांच्या मनात घर करणारे श्रीकृष्ण कवडे यांच्या निधनाने समाजात शोककळा पसरली असून शोक व्यक्त होत आहे.

नाट्यकलावंत व समाजसेवक श्रीकृष्ण कवडे यांची धोबी परीट समाजात एक मार्गदर्शक म्हणून ओळख निर्माण झाली होती. सामाजिक, सांस्कृतिक व जनहिताच्या कार्यात त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने उपचार सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शहरात शोककळा पसरली.
गुलजारपुरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण, प्रकाश तायडे, राजेश भारती, अजहर हुसेन, बबनराव चौधरी, कपिल रावदेव, नितीन झापर्डे, पराग कांबळे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिवंगत आत्म्यास सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.