अकोला दिव्य न्यूज : पुणे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवार १ सप्टेंबरला सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी दिल्लीला स्पाइस जेटच्या विमानाने उड्डाण केले. त्यांनतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. तेव्हा विमान दिल्लीला न जाता पुन्हा पुणे विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरविण्यात आले. यामुळे विमान प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विमानतळावर उतरल्यावर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नियमित वेळेनुसार पुण्याहून सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी दिल्लीसाठी विमान उड्डाण करणार होते. त्यामुळे दोन तास अगोदर प्रवासी विमानतळावार आले होते. वेळेनुसार विमानाने उड्डाण केले. ते विमान दिल्ली येथे सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार होते. परंतु विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटने विमान पुण्याकडे वळविले. सकाळी सव्वाआठच्या सुमारास विमान पुणे विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत उतरविण्यात आले. यामुळे विमानातील प्रवासी प्रचंड घाबरले होते. प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच, त्यांना साधा चहा, नाष्टादेखील विचारण्यात आला नाही. दुपारपर्यंत प्रवाशांची दुसऱ्या विमानात सोय करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. उशिराने दुसऱ्या विमानातून प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी सोय करून दिली.
सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले. त्यांनतर एका तासात विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरविण्यात आले. त्याबाबत विचारणा केली असता विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे, अशी माहिती मिळाली. विमान वळवले नसते तर क्रॅश झाले असते, असे अधिकारी सांगत होते. मात्र, इतर कोणतीही माहिती दिली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विमानतळ प्रशासन आणि विमान कंपनी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.असं विमान प्रवासी ॲड. विशाल जाधव यांनी सांगितले.