घरोघरी चिमुकल्या हातांनी घडविले शाडू मातीची गणेशमूर्ती. निलेश देव मित्र मंडळ व अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प.
अकोला दिव्य न्यूज : गणेशोत्सव हा भक्ती, संस्कार व सामाजिक जाणीवेचा उत्सव आणि या उत्सवात श्रद्धेसोबत पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्याची संकल्पना अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळातर्फे १५ वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आणली गेली. याच संकल्पनेवर पहिले कृत्रिम गणेश विसर्जन कुंड सातव चौकात उभारले गेले.आज अकोल्यात २५ ठिकाणी विसर्जन कुंडे असली तरी, सुरुवात सातव चौकातून झाली ही बाब अभिमानास्पद आहे.

श्रद्धा आणि पर्यावरणाचा सुंदर संगम
सातव चौकातील विसर्जन कुंड हे फक्त पूजाविधीचे ठिकाण नाही, तर पर्यावरण जपण्याचा संदेश देणारी उपासना आहे. भाविकांसाठी येथे संगीतमय भक्तीमय वातावरणात पूजास्थान, निर्माल्य संकलन स्वतंत्र व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, सुरक्षित, स्वच्छ व सोयीस्कर घाट अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मुलांच्या हातून आकार घेतलेले स्वप्न
यावर्षीची खास उपलब्धी म्हणजे शाडू मातीच्या गणेशमूर्ती कार्यशाळा. निलेश देव मित्र मंडळ व अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या पुढाकाराने या कार्यशाळांतून चिमुकल्या हातांनी बनवलेल्या सुमारे १० हजार गणेशमूर्ती अकोल्यातील घराघरात विराजमान झाल्या. या उपक्रमातून मुलांच्या कोवळ्या हातांतून संस्कार आणि पर्यावरणपूरकतेची बीजे रोवली गेली. खेळणी घडवणारे हात जेव्हा बाप्पाला आकार देतात, तेव्हा ती केवळ मूर्ती राहत नाही, तर एक जिवंत संस्कार बनते.
अकोल्याची गौरवशाली परंपरा
अकोल्यातील पहिले कृत्रिम गणेश विसर्जन कुंड : सातव चौकातून सुरुवात. निर्माल्य कलश रथ या अनोख्या संकल्पनेचा जन्म. करोना काळात फिरते विसर्जन कुंड सुरू करणारे निलेश देव मित्र मंडळ विदर्भातील पहिले मंडळ. तब्बल १०,००० शाडू मातीची गणेशमूर्ती घरोघरी.
नागरिकांना हृदयस्पर्शी आवाहन
शनिवार, ६ सप्टेंबर २०२५, सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत सातव चौकातील कृत्रिम विसर्जन कुंड गणेशभक्तांसाठी खुले राहील. ‘स्वच्छ श्रद्धा – शुद्ध पर्यावरण” ही संकल्पना अधिक बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.