अकोला दिव्य : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असल्यानेच गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका ही अनन्यसाधारण महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होते, तेव्हा तिच्या मागे नेहमी कोणत्या-न-कोणत्या मार्गदर्शकाचा हात असतो, भूमिका असते. हा मार्गदर्शक म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्याला वळण देणारा, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायला शिकवणारा शिक्षकच !

भारतीय संस्कृतीतील गुरू व गुरूपौर्णिमा उत्सव म्हणजेच शिक्षक आणि शिक्षक दिन होय. यामुळे शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल किंवा सामान्यत: समुदायामध्ये त्यांचा सन्मान करण्यासाठी उत्सवांचा समावेश असू शकतो.

शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो. मूळात शिक्षक दिनाची सुरुवात कशी झाली? जागतिक स्तरावर शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? जाणून घेऊया..

शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना १९व्या शतकात अनेक देशांमध्ये रुजली; बहुतेक प्रकरणांमध्ये, ते स्थानिक शिक्षक किंवा शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा साजरा करतात. इतर अनेक आंतरराष्ट्रीय दिवसांपेक्षा भिन्न देश हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा करण्याचे हे प्राथमिक कारण आहे. उदाहरणार्थ, अर्जेंटिनाने १९१५ पासून ११ सप्टेंबर रोजी डॉमिंगो फॉस्टिनो सर्मिएन्टोच्या मृत्यूचे स्मरण शिक्षक दिन म्हणून केले आहे.

भारतात दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सप्टेंबर) यांचा जन्मदिवस १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली, तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली.

भारतामध्ये सर्वप्रथम सन १९६२ मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला आणि त्या दिवसापासून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा गेला जाऊ लागला.माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणे माझ्यासाठी गौरवास्पद असेल, असे राधाकृष्णन यांनी सांगितल्याची आठवण सांगितली जाते.

दुसऱ्या देशात केव्हा साजरा करतात शिक्षक दिन
युनेस्कोने ५ ऑक्टोबर हा दिवस आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केला आहे. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला.

इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. साधरण २० व्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली.

जागतिक स्तरावर वेगवेगळ्या दिवशी का होईना, पण हा दिवस साजरा करतात. चीनमध्ये १९३१ मध्ये ‘नॅशनल सेन्ट्रल यूनिव्हर्सिटी’मध्ये शिक्षक दिनाची सुरुवात करण्यात आली. सन १९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस २७ ऑगस्ट हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून त्याला मान्यता मिळाली.
