Sunday, September 7, 2025
HomeUncategorizedन्याय-अन्याय की कुछ पहचान रहें......बाप्पांना साश्रू नयनांनी निरोप !

न्याय-अन्याय की कुछ पहचान रहें……बाप्पांना साश्रू नयनांनी निरोप !

अकोला दिव्य न्यूज : अनंत चतुर्थीला घरोघरी विराजमान सुखकर्ता वरदविनायक गणपतीची १० दिवस सकाळी सायंकाळी प्रसादाचे विविध व्यंजने देऊन, मनोभावे पुजा-अर्चा करून आज शनिवार अनंत चतुर्दशीला अबालवृद्धांसह भाविक भक्तांनी वाजत-गाजत पुढच्या वर्षी लवकर या… म्हणत बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यासोबतच अकोल्यातील १३१ वर्षाची पारंपरिक सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे सायंकाळी ६.३० वाजता मानाचा बाराभाई गणपतीचे प्रतिकात्मक रूपात विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत अनेक गणेशोत्सव मंडळांसह आखाड्यांनी सहभाग घेतला. गणेश विसर्जनासाठी गणेशभक्तांसह महापालिका, महसूल व पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवल्याने बातमी लिहिस्तोवर गणेश विसर्जन शांततेत सुरू आहे.

गणेश विसर्जन मिरवणूक हा अकोल्याचा एक सांस्कृतिक ठेवा बनला आहे. शतकोत्तर परंपरा आजही अबाधित ठेवली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सकाळी ११ वाजता जयहिंद चौक येथून प्रारंभ झाला. यावेळी मानाच्या श्री बाराभाई गणपती मंडळाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी पूजन केले. श्री बाराभाई गणपती मंडळातर्फे प्रसादाचे वितरण करण्यात आले.

श्री बाराभाई गणपतीच्या पाठोपाठ मिरवणुकीमध्ये मानाचे राजेश्वर गणपती, जागेश्वर गणपती व खोलेश्वर गणपती सहभागी होते. त्यानंतर आलेले गणेशोत्सव मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले. असंख्य गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. जयहिंद चौकातून निघालेली मिरवणूक अगरवेस, दगडी पूल, मामा बेकरी, उदय टॉकीज, मानेक टॉकीज, अशोक स्टँड, सुभाष चौक, तेलीपुरा चौक, ताजनापेठ पोलीस चौकी, किराणा बाजार, सराफा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, गांधी रोड, शहर कोतवाली मार्गे विसर्जन मिरवणूक गणेश घाटावर पोहोचली. यावर्षी मिरवणुकीत अनेक गणेश मंडळे व आखाड्यांचा सहभाग घेतला आहे.

चित्तधरारक प्रात्याक्षिके ; ठिकठिकाणी स्वागत
विविध आखाड्यांनी चित्तधरारक प्रात्याक्षिके सादर करून लक्ष वेधून घेतले. ठिकठिकाणी मिरवणुकीत अनेक संघटनांनी चहा, नास्ता व महाप्रसादाचे वितरण केले. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती.

शहरातील सर्वच कृत्रिम घाटवर भाविकांची गर्दी
सार्वजनिक गणेशोत्सवासोबतच घरामध्ये आस्थेने बसविण्यात आलेल्या गणेशाला निरोप देण्यासाठी महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या गणेश घाटसोबतच शहरातील विविध भागात तयार केलेल्या कृत्रिमघाटवर गणेश भक्तांनी गर्दी केली. कुटूंबासह या ठिकाणी आराधना करीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. पारंपरिक वाद्यावर गणेशभक्त रात्री उशीरापर्यंत ठेका धरत होते.

गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली. गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

सर्व छायाचित्र : निरज भांगे अकोला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!