अकोला दिव्य न्यूज : Jawaharlal Nehru’s first Delhi residence in Lutyens’ Zone to sell for ₹1,100 crore : भारताच्या इतिहासातील सर्वात महागड्या घराचा सौदा आता अंतिम टप्प्यात आला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मोतीलाल नेहरू मार्गावरील पहिल्या अधिकृत निवासस्थानाची विक्री होत आहे.

हे घर तब्बल १,१०० कोटी रुपयांना विकले जाणार असून हे निवासस्थान दिल्लीतील लब्धप्रतिष्ठितांच्या लुटियन्स दिल्लीतील आहे. हा लुटियन्स बंगला झोनमध्ये (LBZ) आहे. या मालमत्तेच्या खरेदीमध्ये एका अग्रगण्य उद्योजकाने स्वारस्य दाखवल्याची माहिती इकॉनॉमिक टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.

या बंगल्याचे सध्याचे मालक राजस्थानमधील एका राजघराण्याशी संबंधित आहेत. सुरुवातीला त्यांनी १,४०० कोटी रुपयांची मागणी केली होती, परंतु चर्चेनंतर हा व्यवहार सुमारे १,१०० कोटींवर निश्चित करण्यात आला. खरेदीदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कायदेशीर फर्मने दिलेल्या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, नवी दिल्लीतील या जागेच्या मालकी हक्कांची चौकशी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. कुणाचाही यावर दावा असल्यास सात दिवसांच्या कायदेशीर माहितीसह पुढे येण्याचं आवाहन या नोटिशीमध्ये करण्यात आलं आहे.

अब्जाधीशांमध्ये स्पर्धा
हा बंगला केवळ दिल्लीतील जागेमुळे किंवा त्याच्या आकारामुळे महागडा नाही, तर त्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळेही विशेष मानला जातो. ३.७ एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या या मालमत्तेत २४,००० चौरस फूट बांधकाम आहे. पंडित नेहरू यांनी इथेच सुरुवातीला वास्तव्य केलं होतं आणि नंतर तीनमूर्ती भवनात गेले. या परिसराची (लुटियन्स बंगला झोन) रचना १९१२ ते १९३० कालखंडादरम्यान ब्रिटिश वास्तुशिल्पकार एडविन लुटियन्स यांनी केली.

आज भारतातील सर्वात महत्त्वाचा लब्धप्रतिष्ठितांचा व सुरक्षित असा हा परिसर मानला जातो. या भागात सुमारे ३ हजार बंगल्यांपैकी केवळ ६०० खाजगी मालकीचे आहेत. त्यामुळे अशा जागा विक्रीस आल्या की, अब्जाधीशांमध्ये स्पर्धा सुरु होते.
“स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील वास्तव्यासाठी या बंगल्याची निवड केली होती. परंतु, तीनमूर्ती भवन हेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पहिले घर होते, असा अनेकांचा गैरसमज आहे. तीनमूर्ती भवनाप्रमाणेच या बंगल्यालाही ऐतिहासिक महत्त्व आहे.

पंडित नेहरू हे २ सप्टेंबर १९४६ रोजी अंतरिम सरकारचे प्रमुख झाले, १९४७ च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ते इथेच वास्तव्यास होते, त्यानंतर वास्तुशिल्पकार रॉबर्ट टॉर रसेल यांनी डिझाइन केलेल्या तीनमूर्ती भवनात ते वास्तव्यास गेले.

सोमनाथ धर यांच्या From Partition To Operation Bluestar: Tales Of A Journalist, Bureaucrat, Spy या पुस्तकात त्यांनी म्हटलं आहे की, “१७, यॉर्क रोड हे नेहरूंचं मुख्यालय होतं आणि तिथेच भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण वाटाघाटी झाल्या. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान पंजाबमधून अनेक निर्वासित दिल्लीत येत होते.

निर्वासितांना सरकारबद्दल अनेक तक्रारी आणि नाराजी होती, कारण फाळणीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरितांच्या सुरक्षिततेची हमी दिली गेली नव्हती. तरीदेखील १७, यॉर्क रोड या घराला संरक्षण देण्यात आले नव्हते आणि कुणीही थेट घराच्या मुख्य हॉलमध्ये जाऊ शकत होतं, हा हॉल स्वागतकक्ष म्हणून वापरला जात असे. आजच्या काळाच्या तुलनेत विचार केला, तर देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या घरात कुणालाही तपासणीशिवाय प्रवेश मिळणं अशक्य वाटतं. मात्र ही त्यावेळची वस्तुस्थिती होती.

प्रसिद्ध लेखिका आणि नेहरूंची भाची नयनतारा सहगल यांनीसुद्धा १७, यॉर्क रोड येथे वास्तव केले होतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्या भारतात नव्हत्या. नंतर त्या काकांना भेटण्यासाठी दिल्लीला आल्या. “त्या वेळी पंतप्रधानांचं वेगळं घर नव्हतं. नेहरू १७, यॉर्क रोडवर राहत होते आणि माझ्या नजरेला फक्त निर्वासितांच्या तंबूंनी भरलेलं मोठं आवार दिसलं. तो खूप गंभीर प्रसंग होता,” असं त्यांनी एका लेखात लिहिलं आहे.

अंतरिम सरकारमधील मंत्रिमंडळाच्या बैठका
विशेष म्हणजे, ज्यावेळेस पंडित नेहरू ७, यॉर्क रोडवर राहत होते, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल मित्र बनवारीलाल यांच्या विनंतीवरून समोरच्याच १, औरंगजेब रोडवरील घरात राहत होते. १७, यॉर्क रोडवर राहत असताना पंडित नेहरू गांधीजींना भेटण्यासाठी बर्याचदा ५, अल्बुकर्क रोड (आताचा ३० जानेवारी मार्ग) येथील बिर्ला हाऊसला जात असत.

म्हणूनच पंडित नेहरूं अंतरिम सरकारमधील मंत्रिमंडळाच्या बैठका स्वतःच्या यॉर्क रोडवरील निवासस्थानी घेत असतं. अशा बैठकींना सरदार पटेल, बाबू जगजीवन राम, लियाकत अली खान (जे नंतर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले) यांसारखे नेते हजेरी लावत.

या बंगल्याचे ऐतिहासिक महत्त्व
७६ वर्षांपूर्वी ज्यावेळी जवाहरलाल नेहरू १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यासाठी तत्कालीन व्हाईसरॉय हाऊसला (आताचे राष्ट्रपती भवन) जाण्याची तयारी करत होते, तेव्हा काही साधू त्यांच्या ७, यॉर्क रोड (आताचा मोतीलाल नेहरू मार्ग) येथील निवासस्थानी त्यांना आशीर्वाद द्यायला आले होते. लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लापियर यांनी त्यांच्या Freedom at Midnight या पुस्तकात लिहिलं आहे की, नेहरू फारसे धार्मिक नव्हते, तरी त्यांनी आनंदाने त्या साधूंचं स्वागत केलं आणि साधूंनी त्यांच्या कपाळावर टिळा लावला.

दिल्लीच्या लक्झरी प्रॉपर्टी मार्केटसाठी याचे महत्त्व
या व्यवहारावर शिक्कामोर्तब झाले तर तो भारतातील लक्झरी मालमत्तांसाठी नवा मापदंड ठरेल. लुटियन्स झोनमधील जागांची मागणी वाढत असल्याचं यावरून स्पष्ट होतं. तज्ज्ञ सांगतात की, अशा मालमत्ता क्वचितच विक्रीसाठी येतात आणि त्यावेळी मोजक्या अब्जाधीश व उद्योगपतींमध्ये मोठी स्पर्धा होते.

हा विक्रमी व्यवहार केवळ दिल्लीच्या वसाहतकालीन वास्तुकलेच्या वारसावैभवाचं महत्त्व अधोरेखित करत नाही, तर अशा घरांना उच्चभ्रू समाजात प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं हेही दाखवतो. ‘ड्यू डिलिजन्स’ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील काही आठवड्यांत हा बंगला अधिकृतपणे विक्रीस जाईल.

त्यामुळे मोतीलाल नेहरू मार्गावरील ही मालमत्ता भारतातील सर्वात महाग विक्री झालेल्या घरांपैकी एक म्हणून इतिहासात नोंदवली जाईल.
