Sunday, September 7, 2025
HomeUncategorizedबाप्पा क्षमा ! बुद्धी मागायची मला कधी बुद्धीच झाली नाही............

बाप्पा क्षमा ! बुद्धी मागायची मला कधी बुद्धीच झाली नाही…………

अकोला दिव्य : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : भुतलावर सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता, विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी १५ दिवसांपूर्वी संपूर्ण शहरात लगबग सुरू होती. घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या या बाप्पाची आराधना करताना १० दिवस कधी संपले, कळलेच नसल्याने मनात हुरहूर लागली आहे.

शहरात साजऱ्या झालेल्या या आनंदोत्सवाची आज, शनिवार ६ सप्टेंबरला सांगता होत आहे. ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…’, बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…..अशा घोषणा देत शहरातील मानाचे गणपती, विविध मंडळे आणि घरादारातील भाविक भक्तांची बाप्पाला निरोप देण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुकीत, बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाच्या सरीही हजेरी लावणार असल्याचे संकेत दिसत आहे.

श्रावण महिना सुरू झाल्यावर गणेशोत्सवाची चाहूल लागली. घराघरात उत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली. सजावटीच्या साहित्याच्या असंख्य प्रकारांनी बाजारपेठा सजल्या. एसीसी मैदानावरील प्रमुख बाजारपेठेसह शहरातील मुख्य चौकात गणरायाच्या रेखीव आणि लोभस मूर्तींचे स्टॉल येताच उत्सवाची उत्कंठा वाढत गेली. मंडळाचे कार्यकर्तेही उत्सवाच्या एक दिवस आधीपर्यंत धावपळ करीत होते.

देशभरात सोबतच अकोला व पंचक्रोशीत वाजतगाजत बाप्पांचं आमगन झाले. उत्सव अनुभवण्यासाठी पाऊस असूनही भाविकांचा उत्साह कमी झाला नाही. रोज रात्री मध्यवर्ती परिसरासह इतर भागात भाविकांनी गणपतीची मूर्ती, देखावे बघण्यासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणीचे देखावे, स्तोत्रपठण, गणेशवंदना, पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुका, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे १० दिवस शहरातील वातावरण गणेशमय झाले होते.

आज बघता बघता गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आला आहे, बाप्पाला वाजतगाजत निरोप देण्यासाठी मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. मानाच्या गणपती मंडळांसह सर्वच मंडळांच्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्ये, विविध कला पथके सहभागी होणार आहेत. नेहमी प्रमाणे मुख्य मिरवणूक चौक व मार्गावर रांगोळी काढण्यात आली असून पाणी, चहा नाश्ता आणि भाजीपुरीचे स्टाल थाटली गेली आहे.

परंपरेनुसार सकाळी ११ वाजता मानाचा गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. (अगदी लहानपणापासून मला आरंभापासून मिरवणूकीतील शेवटचा गणपती बघायचं भाग्य लाभलं होतं कारण जय हिंद चौकातच आम्ही राहतं होतो,) अलिकडच्या काळात सुरू झालेल्या प्रथेप्रमाणे गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी शहरातील मुख्य घाटांसह उपनगरांत हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुढच्या वर्षीदेखील ‘पुन्हा नवचैतन्य घेऊन, आमच्याकडे मुक्कामाला या,’ असे आवाहन करीत बाप्पाला निरोप देताना, अनायसे आज जेव्हा गणेशोत्सवाचं व्यापारीकरण झालेलं पाहतो, तेव्हा मला राहून राहून वाटतं की लहानपणी आपण देवासमोर काही तरी चुकीचं केल्याची आपल्याला ही शिक्षा दिली असावी. कुणीतरी म्हटलेलं आहेच की- ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतस रे ईश्वर !

मी तसा उदारमतवादी असल्याने अगदी झोमॅटोवाल्यांनी डिलीव्हरी केलेले मोदकही मला खायला आणि माझ्या देवाला नैवेद्य म्हणून चालतात.पण लहानपणापासून अलिकडच्या काळापर्यंत अनुभवलं ते कसं विसरायचं? घरच्या घरी केलेली आरास, आजी-आईच्या हातचे मोदक, विविध प्रकारची फळे, रात्र रात्र जागून मखरांसाठी बनवलेल्या नक्षत्रमाळी, खळ लावून चिकटवलेल्या पताका, सकाळ-संध्याकाळ साग्रसंगीत चालणाऱ्या आरत्या, दर्शनाला येणाऱ्या भाविकमंडळींकडून मिळणारा खाऊ, शेवटच्या दिवशी भक्तिभावाने होणारे बाप्पाचे विसर्जन, विसर्जनावेळी डोळ्यांत आसवे आणून काठावर उभी असलेली आम्ही बच्चे कंपनी, एक न् दोन.. घरात बसल्या बसल्या ४०-५० वर्षांपूर्वीचा सिनेमाच जणू डोळ्यांसमोरून सरकत जातोय !

आता मला वाईट एकाच गोष्टीचे वाटते, की इतकी वर्ष नेमाने घरी येणाऱ्या या बुद्धीच्या देवतेकडे बुद्धी मागायची मला कधी बुद्धीच झाली नाही.

लहानपणापासून सध्याच्या गणेशोत्सवापर्यंत दरवर्षी 10 दिवसांच्या गणेशोत्सवात घरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून न चुकता सकाळ /संध्याकाळ मनोभावे पूजा अर्चा करतोय. १० दिवसात या भक्ती उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटत बाप्पा मोरया रे…चा घोष देत उत्सवाचं समापण करतो. सेलिब्रिटी गणपतीचे दर्शन किंवा विसर्जन अशा ठिकाणी मी शक्यतो जात नाही. तिथल्या गर्दीत हरवून जाण्याची मला भीती वाटते. लहानपणी आमच्या आईने आम्हाला जगात कुणालाच येत नाही असं युनिक गाणं शिकवलं नाही. वडिलांनीही जगात कुठेच मिळणार नाही असं एखादं लॉकेट आमच्या गळ्यात घातलं नाही. अंगाखांद्यावर गोंदवून घेण्याची हिंमतही आम्हाला झाली नाही. त्यामुळे मी एकदा हरवलो की सापडण्याची शक्यता कमीच. असो, परत विषयांतर व्हायला नको.

अमुकच ठिकाणचा गणपती पावतो अशी अंधश्रद्धा, अशा कित्येक अनिष्ट गोष्टी आज आपल्या सणांत घुसलेल्या असल्या तरी मी गंभीर आशय शोधणारा प्रचंड आशावादी माणूस असल्याने मला या परिस्थितीत सुधारणा नक्की होईल असे वाटते. कालानुरूप तुरळक का होईना, पण शाडूच्या मूर्ती बसविल्या जाऊ लागल्या आहेत. थर्माकोलसारख्या वस्तू टाळून इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांचा टक्काही वाढतोय.

उत्सवासाठी जमविलेल्या पैशांची उधळपट्टी टाळून त्यातून वाचवलेल्या पैशांतून समाजोपयोगी कामं करणाऱ्या संस्था पुढे येत आहेत. घरी धातूची मूर्ती आणून घरातच तिचं विसर्जन करणारे, निर्माल्य पाण्यात न टाकता त्याचं कंपोस्ट करणारी मंडळीही दरवर्षी वाढत आहेत. या छोट्या छोट्या लुकलुकणाऱ्या पणत्यांमध्येच मला उद्याचा देश दिसतोय.

आणि मला दिसणाऱ्या माझ्या या नव्या भारतात धर्माचं आचरण नीतीपोटी होईल, भीतीपोटी नाही अशी मला भाबडी आशा नाही, तर खात्री आहे.पण मला वाईट एकाच गोष्टीचे वाटते, की इतकी वर्ष नेमाने घरी येणाऱ्या या बुद्धीच्या देवतेकडे बुद्धी मागायची मला कधी बुद्धीच झाली नाही.

झुंडीतल्या आणि नशेतल्या लोकांना बोलण्यात काही अर्थ नसतो. म्हणून मी त्या गणाधिपतीलाच हाक देऊन म्हणेन.. ‘गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी जरा लवकर (म्हणजे रात्री अकरा वाजायच्या आत) या!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!